Wednesday 8 May 2019

महापुरुषांची दुकाने

एकदा महापुरुष आणि धर्मपुरुष रिंगण करून बसले.
धर्मपुरुष तांवातावात पुढे येऊन म्हणाले, 'आता पुरे झाले !
अजून पोसायचे तरी किती ? आपसांत वाटून टाकलेले बरे !'
महापुरुष वाकल्या मानांनी खजिल चेहऱ्याने मुकाट बसले.
मराठ्यांनी शिवरायांना छातीशी कवटाळले.
ब्राम्हण पुढे झाले, त्यांनी रामदासांना थोपटले.
तर महारांनी बाबासाहेबांना आलिंगन दिले.
अण्णाभाऊ साठे मातंगांच्या गळा मिठी पडले.
अहल्यादेवींची धनगरांनी तिथेच पूजन केले.
तर माळी ज्योतीबांच्या पुढ्यात जाऊन बसले.
नाभिकांनी शिवा काशिदास गच्च मिठी मारली.
चर्मकारांनी रोहिदासांना आपल्या कह्यात केले.
राजपुतांनी राणा प्रतापांना वेढ्यात कैद केले.
गाडगेबाबांचा ताबा घेण्यास परीट पुढे झाले.
चित्पावनांनी टिळकांना गळाला लावले.
गांधीजींसाठी मात्र कोणी पुढे नाहीच आले.  
असं करत करत काही मिनिटात महापुरुषांची वाटणी सफलसंपूर्ण झाली.

आता धर्मपुरुषांची वाटणी सुरु झाली,
एकामागून एक धर्मपुरुषांची रांग तिथे लागली,
अखेरचा धर्मपुरुष आला तरी त्याचीही बोली नाही लागली.
एकमेका जवळ घेण्यास सर्वच धर्मपुरुषाची पावले अडखळली.
दिवस कलायला आला तरी त्यांना नव्हता कुणी वाली.
शेवटी सारे महापुरुष एक झाले अन त्यांनी त्या धर्मपुरुषांना माणुसकीची 'दिक्षा' दिली !

आता सारे धर्मपुरुष एकत्र राहतात, मात्र महापुरुष तिथून निघून गेलेत कायमचे, न परतण्याच्या अटीवर !
महापुरुषांच्या पश्चात राज्यकर्त्यांनी मात्र त्यांची दुकाने आता लावली आहेत, गल्लोगल्लीच्या नाक्यावर !!

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...