Saturday, 25 May 2019

प्राजक्त


खूप प्रयत्न करूनही ओठातून शब्द फुटले नाहीत
घायाळ मौनाचे अर्थ तिला कधी उमजलेच नाहीत
काळीज पोखरणाऱ्या निशब्दतेचीही एक भाषा असते
जी शब्दांच्या कुबड्यांसाठी कधी मोहताज नसते...

तसं तर ती ही अर्धोन्मिलित ओठांनी पुटपुटली होती काही तरी
पण मातीत रुतलेल्या तिच्या अंगठ्यावरच माझी नजर होती
त्यामुळं तिचं म्हणणं कधी कळलंच नाही...
आता काही दशकानंतर तिला भेटताना
थरथरतात का अजूनही ओठ तिचे, शोधायचं होतं मला
पण पाहताच मला नजर तिने लपवली
अंगठ्यानं ती उकरत होती माती, हे पाहून मात्र हायसं वाटलं !

आता भर उन्हात उभं असताना तिची सावली आवाज देत शोधते मला
भूतकाळाच्या उंबरठ्यातून तिच्या हाका ऐकू येत नाहीत
दाराबाहेरचा पारिजातक मात्र शोषून घेतो तिच्या सात्विक हाका
सकाळ होताच तिच्या हाकांचा प्रतिध्वनी ऐकवण्यास झेपावतात फुलं अंगावर
लोक म्हणतात, अंगणात प्राजक्त फुलांचा सडा किती बहारदार पडलाय !


- समीर गायकवाड 

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...