
अस्ताला जाणारा सूर्य सोनेरी शिखरांवरून अलगद कलतो
घुमटांतून उत्तुंग क्षितिजात उतरतो.
पश्चिमेच्या लाल नभांत विरतो
तुळशीच्या शीतल दिव्यात अन् देव्हाऱ्यातील निरंजनात तेवतो.
पक्षांच्या घरटयात शिणलेली पाठ टेकतो
झाडांच्या ढोलीत बिछाना अंथरतो
प्रेयसीच्या दुखऱ्या पापण्यात ओला होतो
भकाकत्या चुलीच्या अर्धविझल्या निखाऱ्यांना फुलवतो.
हमरस्त्यांवर अंधार शिंपडून
शेत शिवारातील गवतफुलांवर
पिकपाण्यावर जीव टाकून पुढे जातो.
निशिगंधाच्या मादक फुलांना जागं करतो
गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यात झिरपून कासेत पाझरतो
निळ्याकाळ्या मेघांतून परतणाऱ्या पक्षांच्या डौलदार पंखांवर विसावतो!
वेशीवरच्या पारंब्यात झुलतो, तळ्याकाठच्या गारव्यात रमतो.
अस्ताला जाणारा सूर्यच
परसदाराशी रुसून बसलेल्या जाईच्या वेलीत घुटमळतो
खोल गेलेल्या विमनस्क आडाच्या आर्त तळाशी हळूच डोकावून पाहतो
समुद्राच्या लाटांवर लोळून पाण्याच्या तळाशी झेपावतो.
हरलेल्या मद्यपीच्या वेदनांच्या प्याल्यात तरंगतो
कष्टकऱ्यांच्या भेगाळलेल्या टाचांत रेंगाळतो
फाटक्याच झोपडीतला तलम अंधार गडद करतो
गाबडलेल्या वस्त्यातली विकारांची पाती धारदार करतो
वेश्यांच्या भडक मेकअपमधल्या भयाण आम्लास संपृक्ततो.
जुगाऱ्यांच्या डोळ्यात चमक भरतो,
अंधाराची प्रतिक्षा करणाऱ्या तमाम हिंस्त्र श्वापदांच्या इच्छावासना जागृत करतो!
अस्ताला जाणारा सूर्यच विदीर्ण हृदयांत संध्याछायेची भीती घालतो
आणि अंधार जन्माला घालतानाच ध्यासमग्न प्रकाशाची बीजे रोवतो....
No comments:
Post a Comment