पहाटेस दूर नदी किनाऱ्यावरून वाहत येणारा
तिचा गंध मला ओढून नेतो.
पाण्याने तासलेले दगड,
वाटेतल्या दऱ्यांमधले कातळलेले पत्थर
किनाऱ्यावरची हिरवी शेते,
रंगीबेरंगी फुलं पार करून
तिथं ती रोजच माझी प्रतिक्षा करत असते
मला पाहून तिच्या चेहऱ्यावर
प्रसन्नतेची कारंजी फुलतात !
तिच्या देहाला लगटून मी खोलवर फिरत राहतो.
तिच्या बालपणीची खेळणी,
तिच्या संग्राह्य वस्तू ती आनंदाने दाखवत राहते
किशोरवयात दुरावलेल्या
आईवडीलांच्या तसबिरी दाखवताना ती हळवी होते.
कळत्या वयाआधी वाट्यास आलेल्या
पहाडकष्टांची कथा ऐकवते
नियतीने घेतलेले दंशविखार दाखवते.
तिच्या तारुण्यातली पंख विस्कटलेली फुलपाखरं
पाहताना जीव उस्मरून जातो
फुटलेल्या स्वप्नांच्या तडे गेलेल्या फ्रेम्स दाखवताना
तिच्या डोळ्यात चमक येते.
तिच्याकडे काही फोटोही आहेत
तिच्या लग्नाचे, नानाविध घटनांचे...
श्वेतधवल फोटोंचा जुना अल्बम दाखवताना
ती हरखून जाते.
लग्नानंतरच्या, संसाराच्या निष्ठुर आठवणी
तिच्या डोळ्यातून नकळत वाहत राहतात
मुलं वाढवताना झालेली उपासमार,
इच्छांचा कोंडमारा त्यातून स्त्रवत जातो.
तिचं सगळं विश्व दाखवताना ती हरखून गेलेली असते
आयुष्य संपून अखेरीस रिते राहिलेले तिचे हात
आता मला दिवसागणिक अधिकच मखमली वाटतात
तिच्या स्नेहार्द्र मुलायम कायेचा स्पर्श
जगण्याची लढाई सुखद करून जातो..
तिच्यासोबतचे हे जादुई क्षण मी रोज जगतो
दूर पाण्याखाली असताना
तिच्या गर्भात असल्याची पुनरानुभुती घेतो..
ती इहलोकातून गेल्यापासून
त्या नदीचं पात्र कोरडं पडलंय
पण तरीदेखील रोज पहाटे येणारा
तिचा हवाहवासा परिमळ
मला खेचून पुन्हा पुन्हा तिथेच नेतो.
तेंव्हा मात्र त्याच नदीचं पात्र
पाण्याने काठोकाठ भरलेलं असतं
ते पाणी तिच्या अश्रूंच्या थेंबातून पाझरलेलं असतं
आईशी माझी रोज अशीच भेट होत असते,
जी माझी उमेद बनून राहते...
- समीर गायकवाड
(ब्रूस स्पिरिंग्टनच्या ‘द रिव्हर’ कवितेवरून सुचलेली रचना)
No comments:
Post a Comment