माण्साच्या शाळेतल्या प्रतिज्ञा खोट्या असतात,
'सारे भारतीय माझे बांधव आहेत' असं नुसतंच म्हणायचं असतं
पण माण्साने तसं वागायचं नसतं.
माण्साने हिंदू व्हावं, मुसलमान व्हावं,
बौद्ध व्हावं, ख्रिश्चनही व्हावं पण भारतीय होऊ नये.
हिंदूंनी मुसलमानांचा द्वेष करावा आणि मुसलमानांनी हिंदूंचा द्वेष करावा.
बौद्धांनी ख्रिश्चनांचा आणि ख्रिश्चनांनी बौद्धांचा,
उरलेल्या धर्मवाद्यांनीही एकमेकाचा मत्सर करावा.
माण्साने आपली जात गोंजारावी, दुसऱ्याच्या जातीचा दुस्वास करावा.
मराठयांनी महारांचा, महारांनी मराठयांचा द्वेष करावा
या चालीवर सर्व जातीपातींनी मत्सर जोपासावा.
काही बुद्धीभेदयांनी या निखाऱ्यांना कायम पेटते ठेवावे,
पातळ भावनांचे सडके गटार तुंबवावे,
प्रक्षोभक गरळ ओकणारया निर्बुद्ध बैलांना पुढे करत आपण मात्र पडद्याआड राहावे,
माण्साने भाषीय, प्रांतीय अस्मितेची बांडगुळे आपल्या मस्तकात वाढवावीत,
महापुरुषांची नुसती टोलेजंग स्मारके उभी करावीत, त्यात त्यांना खोलवर चिणावे,
कावळ्यांनी त्यावर विष्ठण्यासाठी बेफाम सोडून द्यावे,
महापुरुषांच्या विचारांना काडी लावावी आणि
त्यांच्याच नावाची फुटकळ दुकाने लावावीत.
माण्साने त्यांच्या जयंत्या कराव्यात, पुण्यतिथ्या कराव्यात,
तमाम सोंगे ढोंगे करावीत आणि त्यावर आपली पोळी भाजून घ्यावी,
महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालण्याचे ढोंग करावे,
त्यांच्या कृतींचे खोटे अनुकरण करावे अन त्यांच्या मारेकऱ्यांचा जयघोषही करावा,
जमलेच तर नावडत्या महापुरुषांना शिव्याही घालाव्यात.
उत्सवांचे स्तोम माजवावे, जातधर्माचे झेंडे मोठे करावेत,
कोरडया प्रार्थनांचे गगनभेदी गजर करावेत.
माण्साने माणुसकी सोडावी,
एकवेळ गायी वासरं जपावीत पण माणसं हमखास मारावीत.
पिचलेल्यास पायाखाली रगडावे, माजोरडयांच्या थुंक्या झेलाव्यात.
विवेक गहाण टाकावा, समस्त विरोधकांना नेस्तनाबूत करावे,
त्यांच्या चितांवर आपले महाल उभारावेत.
खोटा इतिहास शिकवावा, सगळी साधने आपल्या ताब्यात ठेवावीत.
तरण्या पोरांचे रक्त उकळवावे, माथी भडकवावीत,
दंगली घडवाव्यात, जाळपोळ लुटमार करावी.
खऱ्यांवर खोटे सूड उगवावेत, वंचितांवर आसूड उगारावेत, अगदी बदफैल व्हावे.
माण्साने गरीबांचा तळतळाट घ्यावा,
शिव्याशापांचा पैसा कमवावा त्यातून इमान विकत घ्यावे.
शिकून सवरूनही अर्वाच्च शिव्या द्याव्यात, एकमेकाची आईबहीण काढावी,
खानदान उकरून काढावे, रोमरोमात नफरत भिनवावी.
उकिरडयावर जगणाऱ्या लुत भरलेल्या गरीब पोराठोरांवर थुकावे,
बायाबापड्या चुरगाळाव्यात अगदी पाळण्यातल्या पोरीलाही सोडू नये,
बाईच्या पोशाखावर मर्यादा आणताना स्वतः मात्र लिंगपिसाट व्हावे,
नुसत्या नजरेनेही घोर बलात्कार करावेत.
सोशल मिडीयावर खोटे नाटे लिहावे, न वाचता फॉरवर्ड करावे.
एकमेकाचा तिरस्कार करावा, मात्र त्यात निवडक भाऊबंदांची काळजीही घ्यावी.
माण्साने दुसऱ्याच्या घरादारावरून नांगर फिरवावा पण आपले उखळ पांढरे करावे.
खोऱ्याने पैसा ओढण्यासाठी निवडणुका लढवाव्यात,
खोटी आश्वासने द्यावीत, मते विकत घ्यावीत, दारू पाजावी,
लालूच दाखवावी, बुद्धिभेद करावा.
वाट्टेल ते करावे पण सत्ताधारी जमात बनून राहावे.
भडक भाषणे द्यावीत, जहाल विषाचे प्याले पाजावेत,
माण्साच्याच लटपटत्या गळ्यात दुःखदैन्याच्या दास्यत्वाच्या शृंखला करकचून बांधाव्यात,
रक्ताळलेल्या वस्त्यांकडे हरीणडोळ्यांनी बघत राहावे,
जमले तर थोडे विभाजनच करावे.
लंपट आस्थेच्या शुभचिन्हांनी भारलेल्या रांगोळ्या दारादारात काढाव्यात,
खोटया किर्तीच्या नेभळट गुढ्या उभ्या कराव्यात.
जंगले कापावीत, चराचराचा विनाश करावा,
पाषाणभेदी यंत्रांनी डोंगर पोखरावेत,
गगनचुंबी इमारती बांधाव्यात त्यात वन-टू बीएचकेची खुराडी तयार करावीत.
माण्साने आईबापांना वृद्धाश्रमात नेऊन सोडावे, नाती विसरावीत,
शेजारधर्म बुडीत काढावा, कृतघ्न व्हावे.
विज्ञान मोडीत काढावे,
महाआरती आणि नमाज रस्त्यावर करावेत,
ईश्वराचा भलामोठा बाजार मांडावा,
प्रार्थनास्थळांचे फास उभे करावेत, त्यात माण्सालाच बळी द्यावे.
इतरांना उपदेशाचे डोस पाजताना माण्साने कुणासाठी काही करू नये,
स्वतःसाठी, स्वतःच्या जातीसाठी, आपल्याच समाजासाठी जगावे.
माण्साने माणसाला खंगवावे,
दोन घासाला मौताज करावे, झिजवावे, कुथवावे.
माण्साने आतल्या गाठीचे असावे,
खरे कुणाला सांगू नये अन भले कुणाचे करू नये,
दुनियेस रखेल करावे तिच्या शोषणावर सुक्ते रचावीत,
अस्पृश्यतेचे भेदाचे धडे गिरवणाऱ्या अधम संस्कृतीला नव्याने गाभण करावे.
भूमीपुत्राला नागवावे, त्याच्या जमिनी हडप कराव्यात,
धनदांडग्यांना त्या कवडीमोल भावात विकाव्यात.
आपल्या विचारांच्या आड येणाऱ्यास बिनदिक्कत देशद्रोही म्हणावे,
देशप्रेमाचे नक्राश्रू ढाळावेत,
माण्साने माण्सावर प्रेम करू नये, स्वार्थी व्हावे,
आपल्याच सडक्या वंशाचे जीर्ण भग्नकाव्य जगाच्या माथी मारत त्याचेच गुणगान करावे.
सरते शेवटी माण्साने किडामुंगी व्हावे,
शेणातली अळी व्हावे,
विष्ठा व्हावे, मुत्र व्हावे पण माणूस होऊ नये !
कारण माणूस होणे आता नामुष्कीचे झाले आहे,
कारण, जातधर्मवादाच्या कट्टरतावादी विषाणूने
माण्साचे रुपांतर विकृत श्वापदात केंव्हाच झाले आहे.
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment