Wednesday, 8 May 2019

पाऊस आईच्या डोळ्यातला ..


वडील गेल्यापासून आईच्या डोळ्यात रोजच वेळी अवेळी पाऊस कोसळतो.
परसदाराच्या डाव्या बाजूच्या खोलीतच आई शांत बसून असते...
आईं आता ऐंशी पार करून गेलीय,
इतके वर्षे ताठ कण्याने जगलेली ती आता काहीशी वाकलीय.
दिवसभरात ती अस्ताव्यस्त वस्तू नीटनेटक्या ठेवते पण
वडीलांच्या कपाटाचे दार कायम किलकिले उघडे ठेवते.
आवडीचं काही वाचत बसते, अधून मधून टीव्हीही बघते..
नकळत एकांतात छताकडे टक लावून बसते.
बसल्या बसल्या सुनेला कामात मदत करते,
मन रिते राहू नये म्हणून हात गुंतवून ठेवते.
एखाद्या ओढाळ दुपारी जुना अल्बम काढून बसते आणि
त्यातल्या जीर्ण झालेल्या फोटोंवरून सुरकुतलेला मखमली हात फिरवते.
अल्बम मिटल्यावर डोळेही गच्च मिटून बसते.
गेल्या कित्येक वर्षात
आईने कधी भरजरी साड्या नेसल्या नाहीत
पण आताशा त्या जुन्या साड्या ती अधून मधून बाहेर काढते,
त्यावर नसलेली धूळ झटकते, घडी उलगडते.
थरथरत्या हाताने त्याची पुन्हा घडी घालते.
कुठला तरी अनामिक गंध ती त्यात शोधत असते,
मध्येच पदराचे टोक गालाला लावते.
साड्यां आवरून झाल्या की जुनी कागदपत्रे बाहेर काढते.
तिच्या स्मृतींचे टवके काढत राहते.
मध्येच उस्मरते, उसासे सोडते,
कधी कधी दाटून आलेला कढ बाहेर पडतो.
आईला आयुष्यात काहीच मिळाले नाही तरी ती इतकं कसं देत गेली,
याचं उत्तर तिच्या अबोल डोळ्यात तरळून जातं..
आई रोज उठून देवघरात जात नाही पण
तिच्या खोलीतल्या पांडुरंगाला अधून मधून ती हात जोडते.
ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटते.
काय सांगत असेल ती त्याला हे मात्र उमगत नाही...
मलूल चेहऱयाने बसल्या बसल्या कोणत्याही प्रहरी झोपी जाते,
पहाट समजून मध्यरात्रीसच जागी होते.
रेडीओ लावायची खटपट करते.
लाईट न लावता अंधारातच बसून राहते.
आपला जोडीदार गेल्यापासून तर ती सदा अंधारातच बसते.
आई नटत नाही, सजत नाही.
वडील गेल्यापासून तर आरसाच तिचा शोध घेतोय पण
घरात असूनही आई त्याला गवसली नाही.
तळहातावरल्या झिजलेल्या रेषा तिचं नशीब आता पुरतं पुसल्याची ग्वाही देतात.
तरीही तिच्या काही इच्छा होत्या का, तिची स्वतःची अशी काही स्वप्ने होती का कधी कुणी विचारलंच नाही,
याची लाजिरवाणी खंत वाटते.
आईपणाच्या समर्पणाखाली तिला आम्ही सगळ्यांनी पोलादी चौकटीत चिणून टाकलं,
पण तिने कधी साधी तक्रारही केली नाही.
बाहेर पाऊस कोसळू लागला की आई खिडकीबाहेर डोळे लावून बसते.
तासंतास ती पावसावर नजर रोखते.
कदाचित पावसात तिच्या मनातले आभाळ रिते होत असावे अन
प्रत्येक थेंबातून वडिलांचा नवा अनुभव तिला येत असावा.
तिच्या म्लान डोळ्यातले उष्ण थेंब त्याची साक्ष देतात.
बाहेर मळभ दाटून आल्यावर खिडकीबाहेरच्या जगात तिचं कोणतं भावविश्व आकारत असेल
याचा विचार करताना नकळत माझेही डोळे पाणावून जातात...

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...