Wednesday, 8 May 2019

माळराने



वाऱ्यांच्या तप्त झुळुकांच्या शिरी दगडफुले नाचती
काटेरी सावल्यांत बाभळीच्या, सरडे थिजती

विखुरल्या मातीच्या अंगाशी उन्हे झोंबती
आभाळाच्या लख्ख आरशात, विहंग चमकती

कोरडया ओढयात शिळा असती टक्क पडुनी
बांधावरच्या सावल्यांत, फुलपाखरे गाती गाणी

जराजीर्ण झाड सजविते स्वप्न पानाच्या देठी
रखरखत्या छायेतही ओल असे, गवताच्या ओठी

मातीच्या कुशीत खोल मुळे शोधित भागीरथी
अंकुरती तरी नवे कोंब, झाडांच्या निष्पर्ण माथी

येता उन्हे डोक्यावर घामासंगे एकांत वाही
नसे उनाड पारवा दूरवर, तरी शीळ घुमते सही

माळरान म्हणजे नभांची नक्षी मातीच्या स्तनी
जिथे उजाडती दिशा, हिरवाईचे गालिचे उसवुनी,

हरवूनी उन्हांना जिंकती तृणफुले तग धरुनी 
सुकती जरी माळराने, शांततृप्ती राहे वास करुनी.. 

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...