Wednesday, 8 May 2019

स्त्रीसूक्त..



शब्दांवर अंधार गोंदवत दिशांदिशांतल्या आसक्तसूर्यांचे बुरखे फाडताना
लाखो स्त्रियांचे कमनीय देह कातळलेत आशयात.
गहजब उडाला, रंडीचे दुःख सूर्याच्या घोड्यांवर स्वार झाले.
नुसतीच कुजबुज वाढली
आता लोक सार्वजनिक ठिकाणीच मास्टरबेट करू लागलेत,
त्याचे काय करणार ?
संस्कृतीची लिंबू मिरची जननेंद्रियाला किती दिवस टांगणार ?
सहा महिन्याची कोवळी पोर असो
वा साठ वर्षाची चमडी ढिली झालेली गलितगात्र वृद्धा असो
पब्लिकचे ‘काम’ भागतेच !

बाईपण मरून गेलंय
आई बहिण आजी आत्या मामी काकी नुरल्या आता.
नरमादीचं हे संक्रमण उंबरठयावर येऊन ठेपलंय,
कबूल करून सत्य,
उपाय केंव्हा काढणार ते तरी सांगा ?

बाई कधीच रंडी नसते
तिला बाजारात उभा करणारा समाज रंडीबाज असतो.
आता तर तो दिवसाढवळ्या कुठेही लिंगशमन करत असतो !
पूर्वी बरे होते
निर्जन स्थळे, पडक्या इमारती, आडोसे वापरले जायचे
अंधारातच ही कामे बिनबोभाट व्हायची.
आता दिवसाढवळ्या कोठेही
पब्लिक प्लेसेसमध्ये ‘शेमलेस’ असतं सारं काही !
तरीसुद्धा काचा झालेल्या बुबुळांनि
आकसत चाललेली महाकाव्ये वाचत बसतो आम्ही.
गोठ्यात शेजारी म्हैस असली म्हणून
रेडा चोवीस तास उडत नाही
अन जंगलातही हरिणी सतत उकिडवी होत नाही !
पिसाळलेल्या एकमेव नरपशूचे हे अंधारयुग आहे. 

बरे झाले,
रंडीबाजारच्या स्त्रीसूक्तात तरी बाईपणाचा हुंकार जिवंत आहे !

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...