Wednesday, 8 May 2019

श्रावणसखा


जड झालेले निळेपांढरे आभाळ साळसूद मांजरीगत डोळे मिटून बसते,
उनाड वारा झिरलेल्या कपड्यातून आत शिरत रापलेल्या कायेला खिजवत फिरतो.
उतरलेल्या खांदयाचीम्लान चेहऱ्याची जरठ झाडे हाताची घडी घालून स्तब्ध उभी असतात.
जुनेर झालेल्या सावल्या दबकतच माथ्यावर ये जा करत राहतात,
तळपती टोकदार तप्तकिरणे असुरलेल्या जिभांनी अंग चाटत जातात.

एखादं वाट चुकलेलं पाखरू हळूच अंगाशी लगट करून जातं,
अज्ञाताच्या शोधात भिरभिरत चाललेलं एखादं पिवळट पान अंगावर पडतंलक्ष मोरपीसं फिरतात !
झाडा झुडपात निजलेले रात्रकिडे अकारण जागे होऊन डोळे चोळत बघत राहतात.
रोखलेल्या सराईत संशयी नजरा उगाच काळजाची कालवाकालव करत राहतात.  
कावरा बावरा रस्ताही पायाखाली येताच चिमटे काढू पाहतो,
कधी काटे अंथरतोकधी पावले भाजून काढतो. 

ठिकऱ्या उडालेले मैलांचे दगड वाकुल्या दाखवत राहतात. 
रस्ता संपतो पण चालणं उरकत नाहीपाय म्हणजे जणू बिनकाटयाचे होकायंत्र झालेले असते.
थिजलेल्या डोळ्यात आसमंत विरत जातो अन सादळलेल्या रक्ताचे संथ अभिसरण होत राहते.
गारगोट्याच्या ठिणग्या उडाव्यात तसे क्षणभंगुर विचार मेंदूत नुसतेच तरळून जातातनिष्फळ !
भाळावरच्या विरक्त रेषांत चिरनिद्रा घेत सटवाई पडून असते.           
कोंदटलेल्या देहातून फक्त घामाचीच लगबग सुरु असते,
बाकीची आत गेलेली भुकेजलेली आर्त आतडी कातडी पायात पोट दुमडून पडलेल्या कुत्र्यागत निपचित असतात.
फरफटत मागे आलेला उस्मरलेला अंधारच शेवटी कामाला येतो,  
कुठे तरी आडरानी गावकुसाबाहेरच्या जागेत कुशीत घेतो अन ढसाढसा रडून त्याचेच दुःख सांगतो !   
उसवलेल्या बिऱ्हाडाची पालं पडतात
दमलेली पावलं झोपी जातातपोट जागं होतं अन 
डोळ्यातला बारमाही श्रावणसखा हलकेच पाझरू लागतो... 

समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...