Wednesday 8 May 2019

या ! इथे सपरात माझ्या ...



या इथे सपरात माझ्या, जरा विसावा घ्या,
लख्ख पितळी तांब्यातले, पाणी गार प्या,
सोबतीला खडा गुळाचा ओठी विरघळवा.
पिंपळपान अंगणातले टेकवेल माथा, आस्थेने तुमच्या खांदयावरी,
गहिवरल्या गाई हंबरतील मायेने, पाठ तुम्ही धरेला तरी टेकवा.
गोऱ्हे तिचे चाटतील हात तुमचे, प्रेमाने त्याला स्पर्श तरी करून बघा !

या इथे सपरात माझ्या, सूर्य खेळे झिम्मा
कवडशात त्याच्या, आभाळ पिऊन घ्या,
संगतीला बेभान वारे काळजात भिनवा.
पारिजातक पडवीतला करेल अभिषेक फुलांचा, तुमच्या मस्तकावरी
पक्षी फांद्याफांद्यावरचे गातील प्रेमगीत, कानोसा तरी घ्या.
बुलबुल टिटव्या साळुंख्या सारेच येतील, जरा दाणे तरी टाकून बघा !



या इथे सपरात माझ्या, झोपती चांदण्या
उजेडात त्यांच्या, स्वतःला निरखून घ्या,
संगे चंद्रकोर डोळ्याच्या पाऱ्यात उतरवा.
ईश्वर ढगांच्या मखमली दुलईतला, गाईल अंगाई थापटून पाठीवरी,
गोधडी माह्या मायची देईल ऊब जन्माची, जरा पांघरूण तरी घ्या.
चंद्र तारेच काय सारं आभाळ यील संगतीला, जरा डोळे झाकून बघा !

या इथे सपरात माझ्या, नांदतो ज्ञानराजा
शब्दात त्याच्या, अर्थ जगाचे समजून घ्या,
शोध घेण्यास तयाचा, दीप अंतरीचा जागवा.
भिंतीतून येईल हाक अनामिक, मायबाप जणू मायेने साद घालती
कणाकणात इथल्या मिळेल स्नेह, देता न आला साठवून तरी घ्या,
अर्थ जगण्याचा वा भेटेल देवही, एकदा अंतर्मनात जरा डोकावून तरी बघा !

या इथे सपरात माझ्या, मन लावून एकदा विसावा तरी घ्या !!

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...