Wednesday, 8 May 2019

स्वर्गाची वाट



स्वर्गाच्या सर्व वाटा मातीतूनच जातात,
मातीचीं नाती जपता त्या आपसूक गवसती !
मातीतून उगवणारे अंकुर साठवता मनी
झाडे घनगर्द देती शीतल सावली
जपता काळजागत मातीत रोवलेल्या बीजां
या वाटांची गावे बहरदार होती.
थेंब मातीत कोसळणारे टिपता आसवल्या डोळ्यांनी
दारे मोक्षाची कोरीव खुलती
ओठी ठेवता मातीचे अजरामर गाणे
होतो परिचय स्वर्गीय गीतांच्या स्वरांशी,
धूळ जित्राबांच्या खुरांची मातीत राबत्या मस्तकी लागता
उभारती यक्ष-गंधर्व पायाशी
गंध भाळी मातीचा ल्येता कुणी
वाट अलगद नेती वैकुंठी !

- समीर गायकवाड
अन्वयार्थ -
मृत्युनंतरचे जग कोणीच पाहिलेलं नाही पण कोणत्याही धर्मात डोकावले तरी मृत्यूपश्चात स्वर्ग, जन्नत वा हेवन अशी वेगवेगळी नावे दिलेल्या स्वर्गीय संकल्पना मूर्तीमंत स्वरूपात रुजलेल्या आढळून येतात. खरे तर याची अनुभूती घेतलेला माणूस मी तरी अजून पाहिलेला नाही. पार्थिव देहाच्या अंतिमसंस्कारानंतर आत्मा पंचतत्वात विलीन होतो. देहावर अंत्यसंस्कार करताना त्याला दहन वा दफन केले जाते. अंत्यसंस्काराचा कोणताही मार्ग बारकाईने अभ्यासला तर असं लक्षात येतं की देहाचे शेवटी जे काही अवशेष उरतात ते अखेर मातीतच मिळून जातात. म्हणून स्वर्गाचे रस्ते मातीतून जातात....ज्यांची या मातीशी नाळ घट्ट असते त्यांना मृत्यूची भीती नसते कारण मातीशी आयुष्यभर संगत केल्यानंतर मातीत मिसळण्याची ओढच निराळी असते...

स्त्री नंतर जगात जर कोणी आपल्या कुशीत बीज अंकुरवत असेल तर ती मातीची आभाळमाया ! या मातीत आपण आसवे गाळतो, स्वप्ने पेरतो, आणि जगाची क्षुधा भागवण्यासाठी त्या मातीवर बीजसंस्कार करतो तो बळीराजा !! त्यामुळे जर कोणी जितेपणीच स्वर्ग निर्मित असेल तर तो मातीत जगणारा माणूस, म्हणूनच स्वर्गाचे सर्व रस्ते मातीतूनच जातात...

मृत्यूनंतर स्वर्ग असेल नसेल माहिती नाही पण जर स्वर्ग असलाच तर वसुंधरेवरल्या स्वर्गाच्या निर्मिकास त्या स्वर्गाची दारे निश्चितच सताड उघडी असतील, म्हणूनच स्वर्गाचे सर्व रस्ते मातीतून जातात....

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...