ज्या रस्त्याने तू गेलीस तो अजूनही दिशांना तुझा पत्ता विचारतो आहे
त्या मातीतल्या तुझ्या पुसट पाऊलखुणात जीव अजूनही उस्मरतो आहे.
तू गेल्यानंतर मोहोर आंब्याला आला नाही की बहर फुलांनाही आला नाही
वेणुनाद पानांतला पुन्हा न ऐकला न वाऱ्यावर गंध फुलांचा वाहत आला !
ज्या दिशेने तू गेलीस ती दिशा अजूनही क्षितिजाकडे डोळे लावून आहे
त्या दिशेतल्या तुझ्या घुस्मटलेल्या हुंदक्यात सूर्य अस्ताचा कलून आहे !
तू गेल्यानंतर मंजुळा हसल्या नाहीत की वृंदावन गहिवरून गेले नाही
सज्जातली तुझी प्रतिमा पुन्हा न दिसली ना चाहूल तुझी घराला आली !
ज्या पंचतत्वात तू गेलीस ते अजूनही निरांजन तेवताना हळवे होते
उतरत्या चेहऱ्याने अंगणातले चंद्रबिंब शोधात तुझ्या सैरभैर होते !
तू गेल्यानंतर ऐन्यात कुणी पाहिलेच नाही की दारी रांगोळी रेखाटली नाही
तू गेलेल्या रस्त्यापाशी येताच तुझ्या असण्याचा भास पिच्छा सोडत नाही !
ज्या घटिकेस तू गेलीस ती अजूनही दिग्मूढ थिजून काळजात आहे
अल्वार स्पंदनात देहाच्या तुझीच तालवीणा अजून झंकारत आहे !!
- समीर गायकवाड
apratim
ReplyDelete