Wednesday, 8 May 2019

पाऊसवेडा चंद्रचकोर ....


छत्तीस तासांपासून पाऊस पडतोय पण झाडांच्या बुंध्यालगत मातीचा थर अजूनी कोरडाच आहे,
त्रिकोणात थवे करून उडणारया पक्षांचे पंख कोरडे आहेत,
गोजिऱ्या फुलांच्या पाकळ्या किंचितच ओल्या आहेत,
झाडांच्या पानांवरून क्वचित एखादा थेंब ओघळतोय,
पर्जन्यवेडया गवताच्या पात्यांची पेंग अजून सरली नाहीये,
बाभळीच्या घरट्यातील काड्यावर नवाडा पाहुणा डोळे झाकल्या पडुन आहे,
झाडाच्या ढोलीतले तांबट-सुतारांचे जग अजुनी उदास आहे,
खोल गेलेल्या विहिरीच्या तळाशी गाळाचेच अजुन साम्राज्य आहे,
कपारीतल्या पारव्यांचे गहिरे निश्वास तसेच आहेत,
गोठ्यातल्या गाईंच्या डोळ्यात शुष्क पाचोळ्याचे तेच प्रतिबिंब थिजून आहे,
वंगणओल्या चाकांनाही चिखलाचा नुसताच अजुनी ध्यास आहे,
तिफणीतले चुकार बियाणे मातीच्या गर्भस्वप्नात नुसतेच दंग आहे,
नभात डोकावणारया देवळाच्या टोकदार कळसाची पर्जन्याभिषेकाची आस
अजुनी टिकून आहे,
मेघांत गवसणी घातलेले मस्जिदीचे आत्ममग्न मिनार कोरडेच उभे आहेत,
मातीच्या कुशीतले अर्धोन्मिलित अंकुर म्लानमाना टाकूनही सचेत आहेत,
चंद्रमौळी घराचे छत मेघास कडाडून भेटण्या अजूनही उत्सुक आहे,
'भिंतीतली ओल, गेली कुठे रुसून' म्हणत आढयातले वासे सुकून गेले आहेत,
मंजुळा हरवलेली तुळस मेघश्यामाच्या आणाभाकात मश्गुल अजून आहे,
दारापुढचा गंधवेडा पारिजातक नक्षत्रांच्या मृगजळाशी आस लावून आहे,
परसातली जाईजुई वाऱ्याच्या सांगाव्यावर पावसाचे स्वप्नझुले झुलवत आहे,
उन्हात वाहिलेल्या माथ्यावरच्या चिवट हंडयांची माळ्यावर बोळवण व्हायची अजुनी बाकी आहे,
पुठ्ठा मोडून पडलेल्या वहीतल्या पानांच्या कागदी 'होडया' कपाटातल्या ड्रॉवरमध्ये पडून आहेत,
हिरमुसला झालेला रेनकोट अजूनही दाराआडच्या हुकात लटकतो आहे,
तिथेच खाली अंगाच्या काडया मुडपून छत्रीची मुठ अबोल झालीय,
पर्जन्योत्सुक चराचराच्या मनातले मेघमल्हार अजूनही भारित आहेत.
देहातल्या मातीच्या आभाळवेणा अजूनही सुरूच आहेत अन
पाऊस हा असा हलकाच येऊन स्पर्शुनी जातोय
हितगुज मातीशी करुनी जातोय,
जणू शस्त्रे टाकून बसलेल्या पार्थास माधव जीवनसार ऐकवितोय !

सारे सारासार जाणूनही मी अजून कोरडाच आहे
म्हणूनच की काय,
'मातीच्या कानात पाऊसथेंबानी सांगितलंय तरी काय ?'
हे उमगायला आणखी बराच काळ लागेल !
एकूणच काय,
माती आणि आभाळ यांचा काहीतरी तहनामा झालाय
अन मधल्या मध्ये माझ्या जीवाचा पाऊसवेडा चंद्रचकोर झालाय...

- समीर गायकवाड.

( सर्वत्र संततधार पाऊस पडतोय असं वाचनात येतंय ..इतरत्र काय होतंय नेमकं कळायला मार्ग नाहीये, आमच्या इथेही परवाच्या सांजेपासून पाऊस पडतोय......मात्र एखादा ज्ञानी महात्मा संताच्या अभंगांचे हळुवारपणे, संथ गतीने, शांतगंभीर स्वरात, सखोल जाणीवांसह विश्लेषण करत भावविभोर वर्णन करतो तशी या पावसाची शैली आहे...)

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...