मंद तेवलेले असतात त्या निर्मिकाचे लामणदिवे.
देहाच्या गाभाऱ्यातला प्रकाश चेहऱ्यावर जत्रा मांडतो.
भाळावर लिहिलेली काबाडकष्टाची गाथा वाचण्यास
होऊनी उतावीळ राधेकृष्णाचा गजर आसमंती करतो.
संध्येचा चंद्र तुझ्या रुपेरी केसांतल्या चांदीत झिरपतो,
तुळशीच्या पानाआडचा वारा घरभर फिरून दमतो.
सुरकुत्यांत मी शोधतो हरवल्या आनंदाचा पारा,
भेगाळल्या ओठांनी तू पुटपुटतेस, आशीर्वाद लेकराला
देवादिकाहून देतेस अधिक, पाठी हात ठेवूनी थरथरता
मी हात तुझा उरी कवटाळत स्मरतो परमेश्वरा
आयुष्य माझे लागू दे रे माझ्या माय माऊलीला!
- समीर गायकवाड

No comments:
Post a Comment