रातंदिन चित्त त्याचं बावरलं.
तुझ्या ओठीचे रंग पूर्वाई ल्याली, पिंगतो वारा तुझ्या कंबरगोंदणि
झाकतेस किती अंग ? तर्राट वारा उडवितो लावण्यखणी !
आल्हाद त्याचे भान हरपलं ...
तुझ्या स्पर्शानं शिवार सारं हरखलं, उन्हाचं चांदणं मनाला चिटकलं ...
मधाळ गं तुझा आवाज, रावा देतो कान होऊन बेभान
काय जादू केलीस, पारव्याच्या शीळेत झिंगते पिंपळाचे पान !
अल्वार त्याचं चित्त थरारलं ...
तुझ्या स्पर्शानं शिवार सारं हरखलं, उन्हाचं चांदणं मनाला चिटकलं ...
रानवाटेच्या सावल्या भुलल्या, तुला शिवूनी त्यांना रानभूल झाली
गर्द पानात तू लपलीस, केवडयाच्या देहात तुझी नशा घुमली
साध्या जिवांचं जिणं चकोरलं...
तुझ्या स्पर्शानं शिवार सारं हरखलं, उन्हाचं चांदणं मनाला चिटकलं ...
तूं आलीस शेवरीगत हळुवार, पर तुझी हूल शिवारभर जागली
बुब्बुळाच्या ऐन्यात माझं काळीज चकाकलं, चांदवेडी रात मोगरयाने चुरगळली !
अबोल श्वासांचं मन गंधाळलं ..
तुझ्या स्पर्शानं शिवार सारं हरखलं, उन्हाचं चांदणं मनाला चिटकलं ...
बिंब चमकते सारया शिवारात, झुलतो मारवा पानाफुलात
लाजतो चाफा अजुनि मनात, गुंतलं माझं मन तुझ्या जास्वंदी डोळ्यात !
असं कसं माझं जिणं लुटलं ?
तुझ्या स्पर्शानं शिवार सारं हरखलं, उन्हाचं चांदणं मनाला चिटकलं ...
- समीर गायकवाड
No comments:
Post a Comment