ऊन थोडंसं निष्प्रभ काय झाले, रंग फुलांचे फिके झाले
येता राज्य उदास मेघांचे, घर सावलीने ही सोडले!
सोने धुंद बहाव्याने उधळले, पक्षी तरीही न परतले
होताच दोनेक पाऊस, झाडांनी करार हिरवाईशी केले
'यंदा उन्ह जरा जास्त होतं, हे आता नित्याचेच झाले’
असं म्हणत गवताच्या पात्यांनी, वसे तलवारीचे घेतले
रस्त्यातून थोडं पाणी वाहताच, भाव कागदी नावांना आले,
कलत्या सांजेला झुरतात आता, उन्हाच्या कवडशांचे प्याले
रंगला नच जरी पाऊस पुरता, तरी शब्दांनी साज ल्याले
रात्रीस घनगर्द आमराईत, आभाळ तारकांनी लगडले
तुझ्या कमनीय आरस्पानी देहात, टिपूर चांदणे चमकले
एक ऋतू काय बदलला, रंग माझ्या कवितेने बदलले!!

No comments:
Post a Comment