अस्तित्वाच्या हुंकाराचे झेंडे अजूनही पाठमोरे आहेत,
दैन्याचे खंजीर अजूनही छातीत शिरण्या सज्ज आहेत.
स्वातंत्र्याच्या गप्पा आता शिळोप्याच्या झाल्या आहेत,
स्वप्नांच्या भाकडकथा अजून किती काळ ऐकायच्या आहेत ?
आश्वासनाची कल्हई लावलेले चेहरे झेंडे फडकवत राहतात.बुद्धीची झिलई उतरलेले लोक तरीही त्यांना भुलतच राहतात,
स्वातंत्र्योत्तर सात दशकात पाणी,रस्ते,वीजच ते देत आहेत.
सुरक्षा, शिक्षण, समानता अजून उंबरठ्याबाहेरच उभे आहेत,
त्यांच्यासाठी दारे सताड उघडी ठेवणार कधी, नेमके सांगणार कोण ?
माजलेल्या रंगीबेरंगी घरभेदयांचे वधस्तंभ उभारणार तरी कोण?
मातीच्या देण्याची होते उतराई,पण सावकारी देणे देणार तरी कोण ?
गरिबी, बेरोजगारी, शोषण यांचे शूल अजून रुतणार तरी किती ?आम्ही देखील वर्षानुवर्षे नुसतेच कोरडे प्रश्न विचारत राहणार की,
'आहे रे' चा थोडा सहभाग आणखी नाही का वाढवता येणार ?
त्यांनी मला काय दिले हा प्रश्न करताना मी काय दिले हे मी स्वतःला कधी विचारणार ?
सकळांच्या जाणिवांचे भान पेटावे यासाठी मशाली आता पुन्हा चेतवाव्या लागणार,
सांगा सुरुवात कशी आणि कुठून करणार, का नुसतीच तिरंग्याचे गुण गाणार ?
- समीर गायकवाड .
No comments:
Post a Comment