Wednesday, 8 May 2019

डोंबारी ...



डोंबारी बालपणीचे खूळखुळे उम्रभर पायी बांधून
भविष्याला उलटे टांगून
भकाकणाऱ्या दर्पाच्या घासलेटी टेंभ्यानं आपल्या आयुष्याचे
धगधगते रिंगण करतो तेंव्हा
विजळलेल्या आंब्यासारखं तोंड
करून पब्लिक त्याला बघून टाळ्या पिटतं….

आडवी चीवाटी हाती देऊन तो रक्ताळल्या रस्सीवर
लुसलुशीत पायांना उभं करतो
पाठीला पोर बांधून पोटाचा तताडम ताशा वाजवतो
चाळ बांधलेल्या बायको बहिणीला, पोरीला जगापुढे नाचवतो
वासनेची अदृश्य फुलबाजी डोळ्यात फुलवून
लोक बिनपैशाचा तमाशा बघत राहतात, जिभल्या चाटतात….

डोंबाऱ्याची अर्धउघडी पोरे धातूच्या रिंगांमधून
काळंसावळं लवचिक शरीर आतबाहेर करत राहतात,
थिजल्या मनाने आवळलेल्या मुठींनी पत्थर फोडतात
स्वतःच्याच भविष्याच्या ठिकऱ्या उडवतात,
सरतेशेवटी आशाळभूत नजरेने हातातली जर्मनची ताटली
बघ्यांच्या गर्दीतून फिरवतात
फुकटची मजा बघणारी दोन पायाची सादळलेली बिस्किटे
हात हलवत धूळ उडवत निघून जातात…

डोंबारी पाले उठवत राहतो.
आयबहिणीचे जुने वजनदार काटेरी चाळ
पोरीच्या नाजूक पायाला करकचून बांधतो.
एके दिवशी ढोलकीच्या टिपरीला पोटच्या पोराचं पोटाचं कोवळं कातडं लावतो
बोटे रक्ताळून जाईस्तोवर ढोलकी ताशा वाजवत राहतो
अंतर्बाह्य आक्रोश करत
माथ्यावर आलेला धगधगता सूर्य वाफाळत्या रक्तात जिरवत
नव्या पिढीचं मातेरं झाल्याची ग्वाही देत राहतो..

स्वातंत्र्यानंतरच्या पारतंत्र्यातही डोंबारी नाचत राहतो
बधीर बघे टाळ्या पिटतच राहतात….

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...