Tuesday, 22 January 2019

नभाच्या गर्भात

कोलाहल दूरवर उठवळ उन्हांचा
गायीच्या डोळ्यातले बेट साकळे मनात
पान्हा आटता नदीच्या स्वप्नांचा
रत्नजडीत पिसारे मोरांचे कुढती वनात
तूझे सुतोवाच करतो रव उल्कांचा
झुरतो पाऊस उष्म नभाच्या गर्भात...

अन्वयार्थ –

या कवितेत 'उठवळ उन्हे' हे प्रतिक आहे जगातील अघोरी लोकांचे जे इतरांच्या भावविश्वात डोकावून त्याचे जगणे हराम करून जातात. अशा वेळी दुःखांचे कढ नकळत मनात साठत जातात. नवा उन्मेष, सृजनता सगळं काही बेचिराख होऊन जातं जणू काही नदीचा पान्हा आटावा अन तिचे पात्र कायमचे कोरडे पडावे तसे मन शुष्क होऊन जाते ! प्रतिभेचे पंख झडून पडतात आणि मन पुन्हा पुन्हा तिथेच धाव घेऊ लागते, जे कधीच हाती लागत नाही त्यासाठी कुढत राहते. अशा वेळी जन्ममृत्यूचे प्रतिक असणारी उल्का जगण्याचा नवा संदेश घेऊन येते. उष्म मेघांच्या गर्भात रोज नव्याने निजताना प्रतिभाशक्तीला नित्य नवे धुमारे फुटू लागतात पण व्यक्त होता येत नाही की मनसोक्त कोसळता येत नाही म्हणून केवळ झुरणे उरते! अशा अर्थाची ही कविता.

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...