एकदा का माणूस गेला की त्याला पुतळ्यात चिणतात.
त्याच्या विचारांना विशालकाय स्मारकात दफन करतात.
नुसताच उदोउदो करत महामानव नावाचं दंभसूक्त रचतात.
बाबासाहेब तरी याला कसे अपवाद राहतील?
उगाच ते या देशात जन्मले!
दलितांनी त्यांना अस्मितेच्या निळाईत बुडवले तर
उच्चवर्णीयांनी आपला पोटशूळ दडवत
दरसाली खोटा कुर्निसात केला.
ज्यांनी जातवर्णाचा वर्चस्ववाद राखण्यासाठी
बेंबीचा देठ ओला करून घेतला
तेही तोंडदाखला निर्लज्जपणा अंगी बाणवतात,
महापरीनिर्वाणदिनाचे औचित्य साधून ते पुष्पचक्रे वाहत असतात.
बाबांचे अनुयायी असल्याचा जे आव आणतात
ते दलितत्वाचे सौदे बिनबोभाट करत असतात,
तर दलितांचे मसीहा म्हणवून घेणारेही
फुटकळ अमिषात विकले जातात.
ज्यांच्या राजकीय विचारधारेत जातीय
वर्चस्ववादाचा विखार ठासून भरलाय,
तेही आता निळ्या मतांच्या गणितापायी
बाबांच्या तसबिरींना हार चढवत असतात.
खरे तर झोपड्यातले झोपड्यातच आहेत,
शिवाय गावोगावचे महारवाडे भीमनगरच्या नव्या नावासह
अजूनही शाबूत आहेत,
आरक्षण घेऊन जीवनमानात बढती मिळालेले कावळे मात्र
सभ्यतेच्या शुभ्र तारांवर खरकटी चोच हलवत विष्टत बसले आहेत.
बाबासाहेब तुम्ही उगाच या देशात जन्मलात,
इथे तुमची जयंतीच नव्हे निर्वाणही धडाक्यात साजरे होते,
पण तुम्ही अजूनही अनेकांच्या डोक्यात जाताहात
अनेकजण तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात
पण कोणीच तुम्हाला डोक्यात ठेवत नाही....
बाबा मला माफ करा,
जरा जास्तच कडवट लिहितोय.
पण करणार काय?
हे बाळकडू तुम्हीच तर पाजले आहे...
- समीर गायकवाड.
(सूचना - पोस्टचा आधार घेऊन जातधर्माची चिखलफेक करू इच्छिणारयांनी विषमतेच्या निर्मूलनासाठी आपण स्वतः वैयक्तिक काही कार्य केले आहे का याचे आधी चिंतन करावे मगच वाफ दवडावी)

No comments:
Post a Comment