Thursday, 4 December 2025

बायको आधी गेली की पुरुष खचतात



उतारवयात बायको आधी गेली की पुरुष पुरते खचतात. 
ज्या पत्नीला मनसोक्त सहवास दिलेला नसतो
तिच्या आठवणींनी व्याकूळ होतात.
हरेक क्षणासाठी पस्तावत राहतात.
तिच्याविषयी त्यांना उघड बोलताही येत नाही,
नुसते घुसमटत जातात
उदास कसनुसे बसून राहतात

खिन्न कोरडं हसतात, इकडं तिकडं शून्यात नजर लावून बसतात
तिच्या चीजवस्तूंना लपून छपून हाताळतात,
तासंतास न्याहाळतात
आस्तिक असले तर देव्हाऱ्यातून बाहेर डोकवताना
आसवले डोळे पुसतात
जीवनातल्या सगळ्या लढाया थांबवत जातात
एका जागी राहणं अधिक पसंत करतात!

काही तासांसाठी मित्रांकडे जाऊन येतो म्हणून एकटेच बाहेर पडतात
एका तासात परत येतात
एखाद्या संध्याकाळी लवकर दिवे मालवून अंधारात बसतात
कधी कधी दिवसभर घुमे होतात
दिवस मावळताच एखाद्या मंदिरात जातात
गाभाऱ्यात न जाता बाहेरच हात जोडून उभे राहतात!

मन रमवण्याचा असफल प्रयत्न करतात आणि
फिरून फिरून तिच्या स्मृतींच्या दरवळापाशी येतात
उतारवयात बायको आधी गेली की पुरुष अंतर्बाह्य बदलतात!

त्यांच्या डोळ्यात डोकावून पाहिलं तर
खोल गेलेल्या ओलेत्या डोळ्यांत दिसते एक आर्त कविता
जी त्यांना कधीकाळी लिहावीशी वाटलेली असते
त्या कवितेत तरळतो जीवनसंगिनीचा प्रसन्न हसरा चेहरा!

- समीर गायकवाड

ही जुनीच पोस्ट. आजच्या तारखेस चार वर्षांपूर्वी विख्यात ज्येष्ठ पत्रकार पत्रकार विनोद दुआ गेले, तत्पूर्वी काही काळ आधी त्यांच्या पत्नीचे कोविडमुळे देहावसान झाले होते. त्यांना देखील बाधा झाली होती मात्र प्रदीर्घ उपचारानंतर ते काहीसे बरे झाले होते. मात्र त्यांच्या मुलीने परवाच्या पोस्टमध्ये लिहिले होते की आई गेल्यापासून बाबा काहीसे थकले होते! तेव्हा हे लिहिलेलं.

नोंद - कुटुंबातील काही ज्ञात अज्ञात दडपणापायी जे मोकळेपणाने पत्नीसोबत जगू शकलेले नसतात, कळत नकळत जे आपल्या पत्नीला सहचारिणी म्हणून वागवण्यास असमर्थ ठरलेले असतात, जे पुरुषी वृत्तीने संसार करतात, आयुष्यभर पत्नीच्या जिवावर रुबाबात राहिलेले असतात, ज्यांच्या पत्नीने अफाट बडदास्त ठेवलेली असते, ज्यांनी पत्नीवर प्रेमापेक्षा अधिकारच जास्त गाजवलेला असतो अथवा ज्यांनी आयुष्यभर तिला गृहीत धरुनच जीवन व्यतित केलेले असते त्या पुरुषांच्या बाबतीत खास करुन असे अनुभव येतात. काही स्त्रियांनाही पतीच्या निधनानंतर असाच अनुभव येतो हेही खरेय. आपल्या जीवनसंगिनीशी जे कमालीचे एकरूप झालेले असतात त्यांची शून्यात गढून असलेली नजर त्यांचं रितं झालेलं विश्व दाखवत राहते. घरातल्या अशा व्यक्तींशी प्रेमाने, मायेने वागलं आणि त्यांच्यासोबर टाइम शेयर केला तर त्यांचे दुःख काही अंशी तरी शीतल होण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment

तोडलेल्या झाडाचे प्रतिबिंब ..

दूर कुठे तरी एकट्याने मरून पडलेल्या देहपंख विद्ध झालेल्या पक्षाच्या भिंगुळल्या डोळ्यात बारकाईने निरखून पाहिले तर तोडलेल्या झाडांचे थिजलेले प...