Saturday 6 March 2021

रंग उदास झाला...

जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला...
हंबरला पिंपळ सांज आभाळी साकळताना
 
शांत जलौघात उतरले प्रतिबिंब अखेरच्या पक्षांचे
घुटमळला प्रवाह नदीचा शोधता तिच्या ठशांना.
 
मेंदीचा हातावरल्या तिचा गंध उरला भवताली
जडशीळ झाली नदी वाहून तिला नेताना

गेले स्वप्न विरघळून पापण्यात चिणलेले
गहिवरल्या चांदण्या डोळ्यात निष्प्राण डोकावताना
 
जिवणीवरच्या नाजूक तिचा रंग उदास झाला
मुका झाला रावा चंद्रकोरी आड जाताना....
~~~ ~~~~ ~~~ ~~~~ ~~~~~
या कवितेची पार्श्वभूमी अत्यंत ह्रदयद्रावक आहे. बनारस म्हणजेच वाराणसीच्या
मणिकर्णिकेच्या घाटावर मृतदेहांवर संस्कार करण्याचं काम अविरत सुरु असतं. दहन देण्याआधी जातधर्म कुळ गोत्र सांगावं लागतं. मग मुर्दहिया त्या प्रेताचे अग्नीसंस्कार पार पाडतो. अगदी नव्वदच्या दशकापर्यंत बनारसमधील शिवदासपूर या वेश्यावस्तीत मरण पावलेल्या बायकांना इथं दहन दिले जात नसे. इतरत्रच त्यांचे विधी पार पाडावे लागत असत. १९९२ मध्ये अकाली मरण पावलेल्या जसोदाबाई या तरुण वेश्येचा मृतदेह अन्य वेश्यांनी लपूनछपून घाटापाशी आणला. मात्र स्त्रियांना पुढे येण्याची अनुमती नसल्याने त्यांनी वेगळी शक्कल लढवली. घाटाच्या पुढच्या भागात त्या गोळा झाल्या आणि जसोदेच्या इच्छेनुसार अग्नी न देता तिला गंगेच्या हवाली केलं. असेही तिथे अर्धेमुर्धे जळालेले मृतदेहही बऱ्याचदा गंगेत सोडले जातात. त्या अर्धवट जळालेल्या कलेवरांच्या साथीने जसोदेचा देह वाहत गेला. काही दिवसांनी बिंग फुटलं. पोलिसांना बायकांना दम देऊन सोडलं. आता परिस्थिती बदलली आहे मात्र रिवाज तेच आहेत. ही कविता जसोदेसाठी लिहिलीय....

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...