Saturday, 6 March 2021

मरणाऱ्याच्या पाठीमागे...

कुणी एक मरण पावल्याची बातमी कळताच 
अर्ध्याहून अधिकांना यात स्वारस्य असतं की 
काय झालं ? कशामुळे मरण आलं ?

वास्तवात हे कशासाठी जाणून घ्यायचं असतं ?
मरण कसं आलं हे उमगताच मृताबद्दलचे पूर्वानुग्रह कच्चेपक्के करायचे असतात
व्यक्ती मरण पावल्यावर श्रद्धांजल्या वाहताना ते कामी येतात !

एक सांगू का ? 
माणूस मेला बात खतम. 
मागच्या श्रद्धांजल्या सब झूठ

एक शिरस्ता म्हणून जगाप्रमाणेच मी ही वाहतो श्रद्धांजली
पुढच्याच क्षणाला दुसऱ्या एकाला देतो शुभेच्छा
सारंच कोरडं... 

तरी एक बरे झाले 
की इमोज्या आल्या. चार शब्द टायपायचे कष्ट वाचले
तसेही श्रद्धांजली, शुभेच्छाही कॉपीपेस्टेड असतात तरी कुणाला कळते काय ?

अपवादाची बेसरबिंदी सोडता  
तिथं सारा समांतर शुष्क भावबाजार
स्वस्त झाल्या भावना नि फुटकळ झाले प्रकटन विचार ... 

लोक वदतात बद्धकोष्ठी भाव आणून, 
कुणी म्हणतो मोठी पोकळी निर्माण झाली. अपरिमित हानी झाली 
अमुक एक पोरकं झालं. वाणी खुंटली. स्तब्ध थिजून अबोल झालो...

खरं तर सर्वांनाच ठाऊक असतं की 
घंटा फरक कुणालाच पडलेला नसतो
ज्याचं रक्ताचं गेलेलं असतं त्याचा तरी शोक किती खरा असतो ?
 
किती एक बोल फुकाचे 
खरे तर हे नाममात्र दाखले सुखदुःखात सामील असल्याचे
भीती असते भावनेच्या प्रवाहात नसलो तर संवेदनहीन ठरण्याची  

वास्तवात इथल्या रोजच्या मरणांचे दुःख तरी किती कुणी आणि का करावे ?
बरे झाले दोस्त हो 
मरणाऱ्याला कळत नसते, जग पाठीमागे त्याच्याबद्दल काय बोलत असते !

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...