Monday 22 February 2021

भूक

स्वप्नात काहीबाही येतं.
बालपणी शाळेबाहेर कुष्ठरोगी भीक मागत बसलेला असायचा.
तेलकट चेहऱ्याचा, कानाच्या पाळ्या जाड झालेला
नाकाचा सांडगा झालेला, गालाची हाडे वर आलेला
डोईचे केस आणि डोळ्याच्या पापण्या झडलेला, भुवया विरळ झालेला
कालच्या स्वप्नात हाती तेच काळपटलेलं जर्मनचं वाडगं घेऊन फिरत होता
फिरून फिरून त्याच्या पावलांत बैलाचे खुर फुटलेले
अन्नाच्या शोधात तो वणवण भटकत होता
खूप काळ फिरत होता तो
त्याचं शल्य त्याच्या डोळ्यात स्पष्ट तरळत होतं
बराच वेळ असाच निशब्द गेला.
काही क्षणासाठी डोळ्यापुढे अंधार झाला आणि
तो पुन्हा दिसला..

त्याचा अन्नपूर्णेचा शोध पुरा झाला होता
पंचपक्वान्नाची इच्छा पुरी झाली होती
गच्च भरलेलं ताट त्याच्या समोर होतं
तरीही त्याच्या डोळ्यात अश्रू होते
त्याची बोटं त्या ताटात झडून पडली होती
त्याला खाता येत नव्हतं
कुणी तरी घास भरवावा म्हणून तो विव्हळत होता.
वाढपी त्याच्या जवळून यायचे जायचे त्यानं घास भरवण्याची विनवणी करताच काही तरी विचारायचे
तो म्लान आवाजात काहीतरी पुटपुटायचा
ते ऐकताच त्याच्या पुढ्यात कुणीच थांबायचं नाही
त्याच्या अश्रूंची धार ताटात पडू लागली होती..

दुरून पाहत होतो
राहवलं नाही
त्याच्या जवळ गेलो, पाठीवरून हात फिरवला
त्याचे डोळे पुसले
मायेने एकेक घास भरवले
अवघ्या काही मिनिटात ताट रिकामे झाले
त्याची क्षुधाशांती तेलकट चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती

कुणी तरी हाक मारल्याचा भास झाला म्हणून तिथून निघालो
मात्र न राहवून त्याला विचारलेच
"वाढपी काय विचारत होते ?"
तो उत्तरला
वाढपी त्याचा धर्म कोणता म्हणून विचारत होते आणि
त्यातल्या प्रत्येकास तो एकच उत्तर देत होता
"भूक ! "

जाग आली तेंव्हा बोटांत सुग्रास भोजनाचा परिमळ दरवळत होता...

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...