Sunday 14 February 2021

वेडे कबीर..

अस्ताव्यस्त बेफाम वाढलेलं बकाल शहर दिवसेंदिवस प्रेमासाठी आक्रसत चाललंय
युगुले इथे शोधतात जागा, आडोसा, एकांत.
पण कुठे मिळत नाही.
भवताली मात्र असते गर्दी, गर्दी, गर्दी आणि प्रेमाचे गारदी.
युगुले बसतात दिशाहीन प्रवासाच्या रिक्षात
बागेच्या कोपऱ्यात, पडक्या इमारतीच्या भग्न अवशेषात
बंद पडलेल्या कारखान्याच्या दर्पयुक्त परिसरात
अर्धवट बांधकाम झालेल्या सुनसान इमारतीत
अपार्टमेंटच्या चाळीच्या वरच्या मजल्याच्या जिन्यात
शहराबाहेर जाणाऱ्या भकास वाढलेल्या वस्त्यालगतच्या ओसाड भागात
झाडांच्या सांदीत
बकवास चित्रपटाच्या अंधाऱ्या थियेटरात
वर्किंग अवर्स संपलेल्या ऑफिसात
सुटीच्या दिवशी कचेऱ्यांच्या कुंपणात
निर्मनुष्य गल्ल्यात, पडक्या घरात
चादरबदली लॉजच्या गलिच्छ मळक्या खोल्यांत
जिथे कुठे असेल एकांत
तिथे असतात युगुले
मनात हजारो विचारांचे काहूर घेऊन !
 
युगुलांवर असते नजर सर्वांची
प्रेम काय करता, आज भगतसिंगांना दिले फाशीवर !
आठवा 'अमुक तमुक' मग करा प्रेम
पाजले जातात फेक डोस
प्रेमाला नाही मिळत प्रोत्साहन.
तरी तुम्ही एक करु शकता
हिंसा करा, उन्मादी व्हा,
कट कारस्थानी बिभत्स आक्रोशाच्या कर्क्कश्य कोलाहलात सामील व्हा,
ध्येयहीन गर्दीचा हिस्सा व्हा, बिनडोक झापडबंद व्हा
अंतहीन अनुसरणकर्ते व्हा
यासाठी मात्र नक्कीच चिथवलं जातं

उरला नाही प्रेमाला थारा
वेडेच होते कबीर, काय किंमत आहे इथे प्रेमाच्या ढाई अक्षरा ?

- समीर गायकवाड

#valentine day

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...