Sunday 14 February 2021

रविवारची दुपार

आणखी एक रविवारची दुपार आलीय
सवयीने तू नाक्याखालच्या ब्रिजपाशी उभी असशील
सुसाट वाहने येत जात असतील सराईतपणे  
झाडं असतील धुराने धुळीने पेंगुळलेली
कडेला पोलीस उभा असेल थोडासा विमनस्क थोडासा बेगुमान

आज शोभा-डेंनी टाईम्समध्ये लिहिलंय की, राहिला नाही
गोवा पहिल्यासारखा
समुद्रतट तसेच आहेत मात्र रेस्तरॉ, गल्ल्या, माणसं, खानपान सगळं बदललंय म्हणे
राहिलंय काय आता पहिल्यासारखं
कुठल्याशा पोर्टलवर आज लाईव्ह लिलाव आहे मुलीचा
पूर्वीही घडत नव्हतं का असंच काहीसं ?


अब्राहम लिंकनने हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र
माडगूळकर मास्तरांचा माणदेश
मन्या सुर्वेच्या कविता
ओ पता नही जी कौनसा नशा करता हैं वाल्या खुबसुरत तितलिया
हे सगळं एका लाल द्रव्यात बुडवून दुपार गरगरत जाते
हा ऐवज दर रविवारी बदलत राहतो

रविवारच्या दुपारी सिग्नलवरची भिकारी मुले विश्रांती घेतात
वृत्तवाहिन्यावरल्या बोलभांड निवेदिका गायब असतात
हायवेवरचे बार लवकरच भरून जातात
कैकांची फुरसत मोडीत निघते तर काही दुपारीच पातळात हात घालून बसतात
तर काही थेट पाताळात जातात

रविवारची दुपार अजब असते
नाही म्हटलं तरी उगाच दुखऱ्या आठवणीचा उमाळा एकदा तरी घेऊन येते
रस्त्यावरच्या ट्राफिकची लय बदलते
झाडाखालची कुत्री अंगाचं मुटकुळं करून बसतात
तिथेच बाकड्यावर झोपलेला असतो अर्धपोटी कुणी फाटका

कुणाच्या तरी घरातून येत असतो खमंग वास
हॉटेलांमध्ये असतो विशेष मेनू
कुठे चाललेले असतात खास बेत
थकलेले काही देह पडून असतात सांजेच्या प्रतिक्षेत

पोरांनी रस्त्यावर मांडलेले खेळ आताशा दिसत नाहीत
ओस पडलेल्या मैदानावर गवतकिड्यांचे डाव भरतात
कस्ब्याच्या कोपऱ्यावर शेडमध्ये बसलेली असतात डंगरी माणसं
हातात घेऊन पत्त्यांचा जुनाच डाव
त्यांच्या डोळ्यातली स्वप्ने असतात मालवलेली

रविवारची दुपार साली बदमाश असते, डोक्यात आग लावतेही आणि विझवतेही...

- समीर गायकवाड 

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...