Wednesday, 14 November 2018

दिक्कालाच्या सीमेवर


सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडाची पानं न पानं उपसून काढली
डेरेदार जुनाट झाड मुळासकट उपसून निघालं
फांद्यावरच्या घरट्यांसकट कोसळलं
रणरणत्या उन्हांच्या साक्षीत गहिवरलेल्या मातीने
गर्भातली काही मुळं घट्ट धरून ठेवली.

दिवस काही असेच शुष्क गेले
एक अवकाळी पाऊस काय झाला
मातीच्या गर्भातल्या कोमेजल्या मुळांनी
जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
आता लवकरच मातीच्या आभाळभर अस्मितेनं
एक अंकुर फुलून येईल.

अंधारलेल्या दिक्कालाच्या सीमेवर
तेव्हा मी उभा असेन औक्षणासाठी
डोळ्यांचे दिवे घेऊन!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ 

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...