विस्तवात चुलीच्या तेवता स्वप्न तलम
भाकरीच्या चंद्रात मन झिरपते अल्वार .
परातीतल्या पिठात ओघळतो नितळ काळ,
मायेच्या पीठभरल्या हाती हरपते भूक.
शाडू रंगल्या भिंती जणू जरीच्याच तार,
चंद्रमौळी छपराला देती भुईतून आधार.
कवडशात तिथल्या पाझरे सारेच हे सुख,
शेण सारवल्या भुईची मऊ किती मखमल,
टेकताच पाठ जणू फिरे मायेचाच हात.
डोळ्याच्या ओलीतून मायची छबी नाही जात..
येई परत फिरूनी जीव माझा रे तिथं,
एका खोलीच्या संसारात जीव रमतो जिथं
सारी सुखं नांदती माझ्या विठ्ठलासंगं तिथं
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment