Wednesday, 24 April 2019

येरझार



सादळल्या जीवाचा गं, जड झाला भार 
भादव्याची काहिली जिवे घामाचे येरझार

थकल्या पायाला फुफुटयाचा आधार
बाभळीचा काटा कुठून शिरे आरपार ?

रांडाव आभाळाचा कसा नेभळा संसार 
विझल्या चुलीत जळे सारे घरदार

धगाटल्या वाऱ्याचा फणा शिवारभर
वसुंधरेच्या मस्तकी का पापाचा भार ?

पिसाळल्या उन्हाने गिळले जलशिवार 
देहाच्या चकव्यास श्वासाचीच घरघर

डोळ्यातल्या उष्म्याची भूल अश्रूंच्या पार 
उघडणार कधी तुझ्या दयेचे दार ?

चिपाडल्या झाडांच्या पाना लागे कातर
फुलांच्या गावी चालती कायेचे व्यापार

थिजल्या काळजाला वाटे पैलतीराचा भार
दयाघना सोसवेना आता; पुरे झाले येरझार.. 

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...