Wednesday, 24 April 2019

रिजेक्ट..


ते कुठेही दिसतात.
डांबरी रस्त्याचे उध्वस्त कोपरे, 

अवाढव्य पुलांखालचे काळोखे कोनाडे
गर्दीने सुजलली रेल्वे स्टेशन्स, 

बस स्थानकं, सिव्हील हॉस्पिटल, 
अस्ताव्यस्त रहदारीने व्यापलेले सिग्नल्स.

ते कळकटून गेलेले. अजागळ अस्वच्छ किळसवाणे.
केसाच्या जटा, अंगावर धुळीचे पुटे, काळवंडलेल्या कपड्यांची लक्तरे.
भेगाळलेले ओठ, हातापायाची वाढलेली नखे. 

चिरलेले तळवे आणि धूळधुरातही चालणारे फुफ्फुसांचे भाते.
चिल्बटलेले केस अन घामेजलेलं अंग.
कधी मळकटलेली पथारी पसरलेली तर कुठे चवाळे अंथरलेलं. 

शेजारीच करकचून आवळलेलं कसलं तरी गाठोडं.

जवळच क्वचित काळपटलेली चेमटलेली ताटवाटी.
आसमंतात विरघळणारा गर्दीचा गोंगाट, 
वाहनांचा कर्कश्श आवाज त्यांच्या कानावरून रेंगून सरपटत एकजीव झालेला.
त्यांचे चेहरे एकसारखेच, 
त्यांची देहबोलीही एकसारखीच.

ते हात पुढे करत नाहीत पण त्यांच्या डोळ्यातून भुकेचा लाव्हा पाझरतो.
मी जवळ जातो, 
काहीतरी द्यावे म्हणून खिसे चाचपतो.
लक्षात येतं की भोवतालच्या सभ्य बघ्यांची 
अस्वस्थ पांढरपेशी नजर माझ्यावर आणि त्यांच्यावर रोखलेली.
मग खूप अवघडल्यासारखं वाटतं.    
मी त्यांच्याकडे पाहतोय, 

जवळ येतोय हे लक्षात येताच त्यांच्या ओलेत्या बुब्बुळात चमक दिसते.
त्यांच्या दर्पाने शिसारी येते, उबळ दाबत तिथं काही  क्षण जातात.


दरम्यान  लोकांच्या नजरेतला तिरस्कार अंगावर येतो, घृणेच्या नजरा अंगावरून तरळत जातात.
त्यांच्या आणखी जवळ जाऊन त्यांची दुःखे विचारावीशी वाटतात, 
असं खितपत जगण्यामागची कारणे जाणून घ्यावीशी वाटतात,
त्यांच्या खांद्यावर हात ठेवावा वाटतो, 

विनातक्रार ऊन वारे पाऊस झेलणाऱ्या त्या निराधारांच्या घुसमटलेल्या जगात शिरावेसे वाटते. 
त्यांचा भूतकाळ कसा असेल याची आर्त उत्कंठा काळजात दफन करून मी परत फिरतो.


तिथून मागे फिरताच लोकांच्या नजरा देखील मागे सरतात.
त्यांना अजून द्यायला हवं होतं असं सारखं वाटत राहतं. 
त्यांची आत गेलेली पोटं, तळहातावरच्या जीर्ण झालेल्या भाग्यरेखा आणि डोळ्यातून ओघळणारी याचना माझ्याभोवती फेर धरून नाचतात.
अपराधाची टोचणी कधी डोळ्यात तर कधी काळजात लावत त्यांना डोळ्याआड करत माझ्या खुशहाल जगात मी आस्ते कदम परततो.

द्रौपदीच्या थाळीच्या पत्त्यावर याचकांच्या वतीने पत्र पाठवतो. 
सव्वाशे कोटी देशबंधूंच्या घरी पोस्टमन पत्र घेऊन जातो. 
कासावीस झालेलं पत्र रोजच रिजेक्ट होऊन परत येतं. 

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...