Wednesday, 24 April 2019

चक्रव्यूह..

कवितेनं उभं केलेलं हे प्रश्नचिन्ह अजूनही कपाळावर वागवतो मी.
कधी अस्वस्थ वाटलं तर आवर्जून तिला पाहतो, ऐकतो.
"आपण काहीच करू शकत नाही का ?"
हा प्रश्न पुन्हा पुन्हा
मस्तकावर घणांचे घाव घालू लागतो तेंव्हा 
सत्याचे नेमके सत्व शोधू पाहतो.


चक्रव्यूह रोजच्या घटनांचा आहे, भवतालाचा आहे, समाजाचा आहे
आणि देशाचाही आहे,
यात अडकण्याची इच्छा ज्या दिवशी दुबळी होते
तेंव्हा पुन्हा पुन्हा कवितेची शाई रक्तात उतरवतो.
शिथिल झालेल्या धमन्यातलं रक्त पेटवतो.
तरीही प्रश्न पडतो -
"माझ्यानंतरही चक्रव्यूह राहणार आहे, तर मी का लढू ?"

मग या प्रश्नाच्या चिरफाळया उडवत सत्वाने जगण्याचे इरादे बुलंद करतो.
आपल्यातलं पुरुषत्व म्हणजे तरी काय याचा शोध घेतो.


स्त्रियांही त्वेषाने या चक्रव्युहात उतरतात, पूर्वीही उतरल्या होत्या.
त्यांच्यातही असतं का मग ते पुरुषार्थाचे तत्व ?
वास्तवात पुरुषार्थ नावाचं काही नसतं.
खरं तर ते असतं ताठ मानेने अन कणखर कण्याने जगण्याचे सत्व.
जे कुणातही असू शकते, कोणत्याही नर मादीत.
रोजच चालणाऱ्या सत्य असत्याच्या संग्रामाकडे
डोळे उघडून पहायचे की नाही हा खरा प्रश्न आहे.
सोईने डोळे उघडणार असू तर चक्रव्यूहच काय आयुष्याची व्याख्याही
कधी कळणार नाही,
तिथं मात्र म्हणता येईल की पुरुषार्थ हरपला.

आयुष्याच्या तराजूत कोणत्या तागड्यात काय तोलायचेय
हे ज्याने त्याने ठरवायचेय,
संसारासाठी. द्वेष तिरस्कार इर्षा यांचं जहर भिनवणाऱ्या
अभिनिवेशासाठी जगायचं,
की वरवर खरं वाटणाऱ्या असत्याचा बिमोड करणाऱ्या
चक्रव्युहात लढत जगायचे
हे ज्याची त्याची जगण्याची प्राथमिकता ठरवेल.
हे सारे पटते तरीही कधी कधी चक्रव्यूहाच्या अर्धसत्याचा प्रश्न पडतो,
मग स्वतःतले काना कोपरे धुंडाळतो,
माझ्यात लपलेल्या षडरिपूंची रास पाहून शर्मिंदा होतो.
मनावरचे मळभ झटकतो.
मग लक्षात येते की,
आयुष्यभर ज्या प्रकाशाच्या शोधात होतो तो जीवनाच्या चक्रव्युहातच होता ..

- समीर गायकवाड.
~~~~~~~~~~~~~~~
 'अर्धसत्य'मधली दिलीप चित्रे यांची कविता -

चक्रव्यूह में घुसने से पहले
मैं कौन था और कैसा था
ये मुझे याद ही न रहेगा
चक्रव्यूह में घुसने के बाद
मेरे और चक्रव्यूह के बीच
सिर्फ़ एक जान-लेवा निकटता थी
इसका मुझे पता ही न चलेगा

चक्रव्यूह से बाहर निकलने पर
मैं मुक्त हो जाऊँ भले ही
फिर भी
चक्रव्यूह की रचना में फ़र्क़ ही न पड़ेगा

मरूँ या मारूँ
मारा जाऊँ या जान से मार दूँ
इस का फ़ैसला कभी न हो पायेगा

सोया हुआ आदमी जब नींद से उठ कर
चलना शुरू करता है
तब सपनों का संसार उसे दुबारा
दिख ही न पायएगा

उस रोशनी में जो निर्णय की रोशनी है
सब कुछ समान होगा क्या?

एक पलड़े में नपुंसकता
एक पलड़े में पौरुष
और ठीक तराज़ू के काँते पर
अर्ध-सत्य

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...