Wednesday 24 April 2019

सावली..

तिला मी शेवटचे कधी भेटलोय 
नेमके आठवत नाही
पण ती सांज खूपच मोठी होती, 

सरता सरली नाही.

काळजाचे डोळे करून 

वाट पाहणारं कुणी असेल का,
की आताही सांज झालीय 

म्हणून काय घरीच जायचं का ?

पूर्वी सांज होताच 

पाखरांचा चिवचिवाट असायचा
आता सूर्यास्त होता 

जीवाची पिसे छिलून निघतात
घरी जाताच 

डोळ्यातला संधीकाळ आरशात उतरतो.
एक सावली नकळत पाठीवर हात ठेवून जाते, 

मी तृप्त शहारतो !

- समीर गायकवाड 

~~~~~~~~~~~~~

ही कविता माझ्या आईसाठी लिहिलीय...
तिला जाऊन आता वर्षाहून अधिक काळ झालाय... तिच्या मिठीत अखेरचा कधी विसावलो होतो ते आठवत नाही, ती गेली तेंव्हाची सांज कधीच संपली नाही, अजूनही तोच उदासवाणा सूर्यास्त पश्चिमेस समोर येतो आणि पापण्या ओलावून जड पावलाने अंधारात विरघळून जातो...आईला रोज पाहणे वेगळे आणि तिला मिठी मारणे वेगळे.. म्हणूनच भेट शब्द वापरलाय... सांज ढळून गेल्यावर घरी गेल्यानंतर एक सावली येऊन पाठीवर हात फिरवून जाते. मी शहारून जातो. तो स्पर्श ओळखीचा असतो ज्याने आयुष्यभर हाताचा पाळणा करून मला जोजवलेले असते... आई होती तेंव्हा घरात गजबजाट होता आणि अंगणात चिवचिवाट होता, आई गेली आणि घर ओस झाले, अंगणातली पाखरं उडून गेली. त्या आठवणींनी आता जीवाची पिसं छिलून निघतात... आईच्या आठवणींचा रेशमी पदर कधीच मस्तकावरून हलत नाही, भले त्याला कितीही ठिगळे लावलेली असली तरी बेहत्तर !...

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...