Wednesday 24 April 2019

अखेरची भेट...


भौरम्माने समुद्र पाहिलेला नव्हता,
समुद्र पाहण्याची तिची अनिवार इच्छा होती.
ती मरण पावल्यावर
गावातल्या लोकांनी तिची रक्षा समुद्रात अर्पण केली....
भौरम्माच्या रक्षा कलशातून विलापध्वनी येत होते,
जणू ती हमसून हमसून रडत होती.
मरणाआधी कित्येक महिने
ती अंथरुणाला खिळून होती,
अखेरचे काही दिवस तर ती बेशुद्ध होती.
गावाने तिची अपार सेवा केली.
तिचे मोठे सरण रचले,
अख्खं गाव लोटलं होतं तिच्या दहनाला
शेजारच्या विश्वनाथनने अग्नी दिला होता.

नवरा मेल्यानंतर उघड्यावर पडलेलं कुटुंब
बोडख्या कपाळाने सावरत
जगाशी संघर्ष करत तिने मुलं घडवली
गावाला भौरम्माचा नितांत अभिमान होता.
म्हणूनच मरणांती समुद्र पाहण्याची तिची इच्छा
पुरी करण्यात आली.
तिचे रक्षाकलश समुद्रात सोडण्यात आले.
ओहोटी नसूनही
सलग तीनदा रक्षाकलश किनाऱ्यावर वाहत आले.
तरण्या दर्यासारंगांनी अखेर खोल समुद्रात जाऊन
त्यांना पाण्याच्या हवाली केले.
नंतर ते कधीच किनाऱ्यास आले नाहीत.

मात्र दुसऱ्याच रात्री विश्वनाथनला स्वप्न पडले,
स्वप्नात भौरम्मा आलेली
आर्त विलाप करत.
समुद्र का पाहायचा होता हे तिने सांगितलं -
साता समुद्रापलीकडे नोकरीनिमित्त गेलेल्या
मुलांना तिला भेटायचे होते !
आपली मुलं आईला विसरली तर नाहीत ना
याची खातरजमा करायची होती...
रक्षाकलश समुद्रात सोडताच तिने समुद्रास विचारलेलं
“मुलांनी माझी आठवण काढत
कधी वाळूत रेघा मारल्या का ?”
तिच्या सवालावर खिन्न समुद्र मौन राहिला.
त्याच्या मौनाने तिचा जीव गुदमरला..."

खरे तर तिला धरणीमातेकडे परतायचे होते,
मुलांना मिठीत घेऊन अखेरचे श्वास सोडायचे होते
म्हणूनच अथक प्रयत्न करून प्रवाहाविरुद्ध वाहून
तिने रक्षा कलश किनाऱ्यावर आणलेले..

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...