Wednesday 24 April 2019

पुस्तकांचा अर्थ ....


तिच्या चेहऱ्यावरचं पुस्तक मन लावून वाचलं
तरीही प्रेमात उत्तीर्ण झालो नाही
दरम्यान
पाठ्यक्रमाची क्रमिक पुस्तकेही कशीबशी चाळत गेलो,
खूपच रटाळ होती ती.
निकालात जेमतेम काठावर तगलो !
तरीही आयुष्याचा पट मात्र मखमली झालाय.

सोबतीला सहाध्यायी असणारे काही सखे खूप हुशार होते
मन लावून अभ्यास केला त्यांनी,
मास्तर म्हणायचे, 'बघ, असं पुस्तकी किड्यासारखं पानापानात शिरावं लागतं मग कुठं यश मिळतं !"
सर्व कसोट्यावर त्यांनी अफाट गुण मिळवले
त्यांच्या आयुष्याचा पट तर आता सोनेरी झालाय.

मात्र एक फरक झालाय
वयाची चाळीशी उलटल्यावरही त्यातले काही प्रेमाच्या शोधात आहेत,
काही आयुष्याचा अर्थ धुंडाळताहेत
त्यांचा तो सुवर्णपट आतून काटेरी असल्याचा शोध कालच लागलाय...

बरं झालं, तिच्या चेहऱ्यावरचं पुस्तक मी पूर्वीच वाचलंय.
आता केवळ मध्यात आलोय पण तृप्तता शिगोशिग भरलीय !

दोस्तहो, पुस्तकं तर आयुष्य घडवतातच पण
जिती जागती माणसंही वाचता यायला हवीत
पुस्तकांचा अर्थ तेंव्हा कुठे उलगडत जातो !

- समीर गायकवाड

@पुस्तकदिनाच्या शुभेच्छा...

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...