Wednesday, 24 April 2019

वसुंधरेच्या कविता...



वसुंधरेने आकाशाच्या पानावर लिहिलेल्या कविता म्हणजे वृक्ष !
आम्ही ते तोडून त्याच्यापासून कागद बनवतो त्यावर पोकळ शब्दांचा आलेख मांडतो
आणि त्याला साहित्य म्हणतो !
वसुंधरेच्या कवितेशी कधीही बरोबरी करू न शकणारे साहित्य !
आमची गीतेही खोटीच असतात.
खरी गीते आपल्या आसपासच असतात, जी सृष्टीने रचलेली असतात.

जसे की,
आईच्या हृदयातील शांततेत निद्रिस्त झालेलं गीत तिच्या छातीशी बिलगलेल्या बाळाच्या ओठांवर खेळतं !
पाऊस थेंबांनी आपला देहदाह विझल्याचं गीत माती गाते,
तिची भाषा असते मृदगंधाची !

मरणासन्न झालेला जीर्ण वटवृक्ष कोसळण्यासाठी तिष्टत असतो
अन चकाकणारी सौदामिनी त्याच्यावर झेपावते,
वटवृक्षाचा कोळसा होतो पण मरतानाही तो गीत गातो.
त्याची भाषा असते मिठीची !

वसुंधरा जेंव्हा रुसते तेंव्हा
तिला रिझवण्यासाठी पिसाळलेले ढगही आत्ममग्न होऊन दोषानुभूतीने काळे ठिक्कर पडतात.
वसुंधरेनेच लिहिलेल्या कवितेला आर्त शब्दात गाऊ लागतात,
वृक्षांपाशी आपला निरोप देतात अन एके दिवशी संततधार बरसून तिला चिंब भिजवतात.
ते गीत असते मिलनाचे !

अप्सरेच्या तलम केसांत माळलेल्या गजऱ्यातली दुर्मुखली फुले मुकीच राहती
झाडांवरून गळून पडणारी कोमेजली फुले आनंदे गिरक्या घेत गीत गाती,
त्यात असते तत्व जगण्याचे, हसऱ्या कळीच्या जन्मापासून ते सुखद मृत्यूचे !

असलं काही आपण रचू शकू,
तेंव्हा आपल्या शब्दांना कविता म्हणता येईल,
गीत म्हणता येईल,
साहित्य म्हणता येईल.
तोवर आपला केवळ पोकळ शब्दखेळच चालू आहे असं म्हणायचे......

- समीर गायकवाड.

खलिल जिब्रानच्या कवितेवरून सुचलेलं..

No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...