Wednesday 24 April 2019

नाच...


का रे पडतोस तू असा ? माझे घर जाते ना कर्दमून, 
अन छत लागते की ठिबकाया !
ओलेत्या अंगावर ल्यावे लागते ओलेतेच धडूते, 
ज्याची आधीच गेलेली असते रया !

पाणी झिरपते कुडातून, सरपण जाते चिंब भिजून 
अन चूल बसते डोळे मिटून !
गळक्या छपराखाली पातेले पडते अडकून, 
सांग आता सैपाकास भांडे आणू कुठून ?

एकच गोधडी तू तिलाही न सोडी, एकच दंड घातलेली सतरंजी अन तुझी त्यावरही रुंजी !
तुटक्या फडताळाचे जीर्ण लाकूड जाई कसे फुगून, चिखलाने तुझ्या मोरी जाते की तुंबून !
दप्तर ओले होता अक्षरं जाती मिटून, 
तूच सांग आता देईल अभ्यास कोण लिहून ?
सारवण जाते वाहून अन पाय जाती भेगाळून, 
नेणार नाही कोणी ओझे माझे वाहून.
पडतोस ते पडतोस अन गर्जनाही करतोस, 
सानुला रे भाऊ माझा जातो की घाबरून !
येतोस तू खुशाल रे मेघांना झाकळून, 
अन आयुष्य माझे इथे हवेत जाते की सादळून.

असते जर माझेही आईबाबा, 
तर तुझ्या थेंबाथेंबात मीही नाचले असते की रे भरभरून !!!

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...