
थोडंसं तारवटलेलं आभाळ काय आलं
गवताच्या पिवळटलेल्या मलूल
पात्यांनी माना वर केल्यात !
दिगंतापाशी वाऱ्याने पाठ काय
टेकली
सुकल्या पानांनी पानगळीच्या वाटा
बदलल्यात.
अस्मान घनगर्द काय झालं
घरट्याकडं जाणाऱ्या पाखरांच्या
फेऱ्या वाढल्यात.
अस्वस्थ मीनार कलत्या नभात दडले
काय
काळजात मंदिराच्या कळसांच्या
वेदना झंकारून आल्यात !
मेघांची घुम्या गर्दी काय झाली
आसावल्या डोळ्यांत मायच्या आठवणी
दाटून आल्यात.
दूर रानातुनी केकांचा नाद काय आला
उदासवाण्या आसमंतात मयूरपंखी
शब्दकळा पसरल्यात...
- समीर
गायकवाड.
No comments:
Post a Comment