Wednesday 24 April 2019

चैत्रातला वैशाख .....




पार्थिवाजवळच्या शोकमग्न आप्तेष्टांसारखी 

झाडे निश्चल उभी असतात तेंव्हा

जणू आईच्या कुशीत तोंड खुपसण्यासाठी 

सकल मेघ निघून गेलेले असतात.

निरभ्र झालेले आकाश एकटेच उरते,  

मुलाच्या अकाली मृत्यूनंतर थिजलेल्या बापासारखे !

एरव्ही उन्मुक्त वाहणारा वारा क्षितिजपार 

तोंड लपवून उभा असतो,

निष्पाप अनाथ मुलासारखा.

श्रद्धांजली वाहताना निशब्द झाल्यागत

गळपटलेली तमाम पानेफुले स्तब्ध असतात.

एरव्ही उनाडक्या करत फिरणारे पक्षी 

पंखाचे ओझे झाल्यामुळे की काय,

मोडकळीस आलेल्या घरटयांत,  

वाळक्या फांद्यात अचल असतात.

पाणी आटत आलेले शुष्कओले तळे,

बगळयांच्या विरहाश्रूंच्या शोधात खोल खोल जात राहते.

गरम फुफुटयाने भरलेला धगधगता अनवाणी रस्ता,

वाटसरूंच्या शोधात ऊनसावलीच्या बेटातून 

नागमोडी वळणे घेत धावत असतो.

विहिरीच्या तळाशी कोरडया होत चाललेल्या 

जडशीळ गाळाला

वळवाच्या मृगजळांचा स्फटिकाभास होत राहतो.

उन्हाने भोवळ येऊन पडलेल्या मयूरपंखी फुलपाखरांभोवती,

मुंग्यांची शिस्तबद्ध शोकसभा भरते.

सुकलेल्या फळांच्या नीरस टणक सालींना

पोखरून टोकरून मुंगळे हताश झालेले असतात.

भेगाळलेल्या देहानं उन्हे झेलणारी माती

चोळामोळा होऊन गेलेली असते,  

वार पडलेल्या गायीसारखी !

देहाची काहिली करणाऱ्या उन्हात सगळा आसमंत,

अंतर्बाह्य घुसमटून निघत असतो ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखा.

 

सकाळीच सुरु होणाऱ्या घामाच्या धारा मेंदूत झिरपून सांगत राहतात,

चैत्रात आलेला वैशाख वणवा असाच जाळत असतो !

 

समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...