आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय
मातीच्या कुशीत तोंड खुपसून मनसोक्त रडतोय,
कळ्याफुलांना न्हाऊ घालून अलगद ओघळतोय ,
फांद्यांशी गप्पा करून बुंध्याशी बिलगतोय,
पानगळीतल्या पानांशी श्वासाच्या गुजगोष्टी करतोय. ....
आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय
मंदिराच्या कळसाला अभिषेक करतोय ,
दर्ग्याच्या मिनाराभोवती सुफियाना गातोय,
पारावरती शैशवाच्या स्मृती जागवत नाचतोय,
आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय
जीर्ण खिडक्याच्या गजांआडून घराघरात डोकावतोय,
गोठ्याच्या चंद्रमौळीतून गाईच्या डोळ्यात उतरतोय ,
अंगणातल्या तुळशीवृंदावनाशी झिम्मा खेळतोय,
पडवीतल्या जाईच्या वेलीशी अंगचटीस जातोय. .....
आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय
शाळेच्या निसरड्या अंगणात कवायत करतोय,
पोटरीभर पाण्यात मोकळ्या अंगानं नाचतोय,
चावडीत पाठ टेकवून देहातला शीण घालवतोय,
गल्लोगल्लीच्या घळीतनं लहानग्या नद्या बनवतोय. .....
आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय
बापजाद्यांच्या समाधीवर ओलेत्याने माथा टेकतोय,
कागदी होडयांसंगे वाहताना दंग होऊन जातोय ,
पाणंदीच्या आमराईत बालपण शोधत फिरतोय ,
तळयाकाठच्या वडाच्या पारंब्यांना लटकतोय....
आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय
क्षितिजाच्या बांधावरती घसरगुंडी खेळतोय,
मेघांतल्या तल्लख सौदामिनीला मस्तकी घेतोय,
वाऱ्याच्या कानी क्षेमकुशलतेचे सांगावे देतोय,
मृदगंधाने धुंद होऊन अंगांगी फुलून जातोय.....
आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय
विहिरीत उतरून कानाकोपरे धुंडाळतोय,
घरट्यातल्या पिलांवर टपोरे थेंब उडवतोय,
जुन्या म्हाताऱ्या सवंगडयांच्या शोधात झुरतोय
खडबडीत भिंतीतून पाझरताना डोळे पुसतोय.....
आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळतोय,
कोसळून झाल्यावर ताठलेल्या लिंबापाशी गहिवरून जातोय,
'माझ्या लेकराने इथेच घेतला होता का फास ?' असं म्हणत तरमळतोय...
आज गावाकडे पाऊस धुव्वाधार कोसळूनही जीव घुसमटतोय....
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment