ज्याच्यासोबत माझं स्नेहार्द्र नातं होतं
तो नंबर फोनच्या स्क्रीनवर जरी दिसला
तरी माझा दिवस सुखात जायचा
त्या नंबरसोबत माझं नातं यत्र तत्र,
कॉल, टेक्स्ट, व्हॉटस्अप सर्वत्र होतं!
दिवसाच्या प्रारंभापासून मध्यरात्रीपर्यंत
तो नंबर कैकदा क्षेमकुशल विचारायचा
आज तो नंबर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नाही
मात्र तो नंबर मी विसरलो नाहीये
कधीतरी चाळा म्हणून तो नंबर टाइप करतो
मात्र कॉल कधीच लावत नाही,
काही वेळ फोनच्या स्क्रीनवर तो नंबर पाहतो
आणि मग डिलिट करून टाकतो.
तो एकमेव नंबर असा आहे की
जो टाइप केल्यानंतर हसू, आसू, संताप
साऱ्या भावना एकत्रच मनात दाटतात
नाते संपून गेलेय, काळ खूप लोटलाय
जग देखील खूप पुढे निघून गेलेय
कदाचित मीही आणि तो नंबरही पुढे गेलाय.
परंतु आजही तो नंबर तसाच आहे
आणि जसाच्या तसा माझ्या लक्षात आहे
असे कित्येक नंबर्स कित्येक जणांच्या
मोबाइलमध्ये टाइप होत असतील
आणि पुढच्याच क्षणाला डिलिट होत असतील.
एक अक्षरही न बोलता माणसं संपर्कात असतात
आपण कुणाच्या तरी आठवणीत असतो
आणि आपल्या आठवणीत कुणीतरी असतं
कदाचित अखेरपर्यंत कधीच संवाद होत नाही
तरीही आठवण येताच
ओळखीचा गंध वाऱ्यावर आल्याशिवाय राहत नाही!
तुमच्याही फोनमध्ये टाइप होतो का, असा एक नंबर?
- समीर गायकवाड

No comments:
Post a Comment