मी अंगण होतो तू प्राजक्त हो, तू तुळस हो मी वृंदावन होतो
राखण घराची करताना गवाक्षातुन, घनश्याम बघ कसा डोकावतो!
मी माती होतो तू आभाळ हो, तू पाऊस हो मी वीज होतो,
पिऊनी मृदगंध फिरताना, परसात धुंदवारा बघ कसा गुणगुणतो !
मी बीज होतो तू अंकुर हो, तू तहान हो मी पाणी होतो,
मातीतून उगवलेलं स्वप्न हिरवं पाहताना, विधाता बघ कसा हरपतो !
मी वृक्ष होतो तू सावली हो, तू बासरी हो मी स्वर होतो
साजसंगीत आपल्या सुरांना चढवताना, निसर्ग बघ कसा डोलावतो !
मी चांदणं होतो तू उजेड हो, तू वात हो मी ज्योती होतो.
अक्षरगाणं संसाराचं ऐकताना, तल्लीन होऊनि विठू बघ कसा हसतो !
मी कपाळ होतो तू गंध हो, तू तबक हो मी निरंजन होतो
चिरंतन आपुल्या अगाध प्रेमाचं, निहंता बघ कसं औक्षण करतो !
मी प्रयत्न होतो तू कर्तृत्व हो, तू नियती हो मी प्रारब्ध होतो
जगणं जरी असलं कळसूत्री तरी, प्रेम मात्र आपण खरंखुरं करतो !
- समीर गायकवाड.
No comments:
Post a Comment