पाच भिकारी जमावाने जिवंत ठेचून मारले,
आम्ही निर्विकारपणे त्याचे व्हीडीओ पाहिले,
चोरी, अपहरण, छेडाछेडी, धर्मभेद, वर्चस्ववाद, गोहत्या, गोवंश मांस
कसलाही संशय जमावास पुरेसा असतो.
वर्तमानपत्रीय भाषेनुसार गत काही दिवसांत
द्वेषाने ठासून भरलेल्या खोटया माहितीचे छद्म आम्ही सर्वदूर पोहोचवले.
कधी समोरच्याने जाळीदार टोपी घातली म्हणूनही जमावाने अगदी चेवाने 'खेचून' मारले.
आमच्यातले काही यावरही खुश झाले,
'यांना मारलेच पाहिजे'चा उन्माद केला.
तर कधी शिवरायांच्या चित्राचा टीशर्ट परिधान केला म्हणून
जमावाने गर्दीत 'हेरून' मारले.
यावर आम्ही जातीभेदाची पोलादी भिंत किती भक्कम झाली याची पोकळ चर्चा केली
आणि खाजगीत मात्र माथी भडकावली.
'भीमगीता'ची रिंगटोन ठेवली म्हणूनही जमावाने करकचून आवळून मारले.
आम्ही महापुरुषांच्या नावाची दुकाने बुलंद केली,
त्यांच्या नावाचे शस्त्र अधिक धारदार केले.
मोकाट सुटलेल्या जमावाने आता
नीचपणा, निर्लज्जता यांची सीमा ओलांडलीय,
कुठेही कधीही सामुहिक नागवे होत आम्ही कुणावरही बलात्कार केलेत
आणि पाशवी खूनही केलेत.
आम्ही त्यावरही उपाय शोधलाय,
आरोपींची जात धर्म हुंगून
आमच्या खास प्रशिक्षित जमावाने त्यांची पाठराखणही करायची
हे बाकी आम्हाला खास जमलंय
पीडिता ज्या जातीधर्माची त्याच लोकांनी आवाज उठवायचा
हे तत्वही आता आमच्या अंगवळणी पडलंय
इतरांनी तेंव्हा तोंडाचा चंबू करायचा,
हत्यारबंदांच्या वाती शिलगावयच्या यातली विकृत मजा अफाट आहे !
बेभान अमानुष जमाव आता अधिक उन्मत्त, मदांध, निर्दयी, क्रूर होतो आहे....
कोड्यात पडलेल्या सरकारची कारवाई जारी आहे,
भरकटलेल्या पोलिसी यंत्रणेचा तपास जलद गतीने सुरु आहे,
घरादार उघड्यावर पडलेल्या मृतांच्या वारसांना भरपाई जाहीर होते आहे,
'पिडीत' नावाची नवी जमात कँडलमार्चच्या साक्षीने देशभरात जन्माला घातली आहे
जिच्या उंबरठयावर जाती धर्माचे लेबलं लावलेले
तत्वाचं वीर्यस्खलन झालेले तमाम राजकारणी आपलं शिश्न घासत आहेत.
लोकशाही छिनाल आणि कायदा षंढ झाला की
जमावाच्या अनैतिक संततीचे पीक जोरावर असते
केवळ देशात नव्हे तर
भारतमातेच्या गर्भाशयातही आता तणावपूर्ण शांतता आहे,
नवे क्रांतीकारक ती जन्माला घालणार नाही कारण
तिच्या देशात आता माणसे उरलीच नाहीत,
उरले आहेत ते वेगवेगळ्या रंगात आणि वर्गात वाटले गेलेले बेभान जमाव...
- समीर गायकवाड
No comments:
Post a Comment