Wednesday 24 April 2019

हे सावित्रे...




गल्लोगल्लीचे सत्यवान दारू ढोसून
बायकोला मारत असतात गुरागत.
इच्छा असेल तेंव्हा हवं तसं भोगतात,
भले मग तिच्या अंगात ज्वर असला
तरी तिने कन्हायचे नसते.

तिने मारायचे असते मन,
तो सांगेल तेच कपडे घालायचे असतात,
त्याच्या आवडीनुसारच नटायचं असतं.
त्याच्याच फर्माईशीवर तिने जगायचं असतं.
त्याने बाहेर तोंड मारलं तरी तिनं दुर्लक्ष करायचं असतं.
काहीही झालं तरी
मान वर करून परपुरुषाच्या नजरेत नजर घालून बघायचं नसतं.
ताट आणि खाट यांच्याच कक्षेत तिने गुरफटून घ्यायचं असतं.

त्याने हव्या तितक्या पार्ट्या करायच्या असतात,
तिने मात्र मन मारून न्यायचे असते.
त्याची सेवा करायची असते,
त्याचे हातपाय दाबून द्यायचे असतात

त्याने मात्र तिला लाथाडायचे असते.
तिने आपल्या रक्तामांसाने पोरे जन्माला घालायची असतात
आणि त्याच पोरांनी मोठं झाल्यावर
हात उचलला तरी तिनेच गप्प बसायचे असते.
सगळी जाग्रणे तिनेच करायची असतात,
खस्ता तिनेच खायच्या असतात,
भार तिनेच वाहायचा असतो.
व्रत वैकल्यांचे थोतांडही तिच्याच वाट्याला असते,
तिने पोट मारताना याने मात्र भरपेट वरपायचे असते.
सणवारांनाही तिने कामाला जुंपून घ्यायचे असते,
तिचंही एक विश्व आहे हेच तिने विसरायचेच असते...

म्हणूनच हे सावित्रे तुला मी निक्षून सांगतो,
एकदा तुझ्या वाट्याचं निरभ्र आकाश तरी बघ आणि खुले श्वास तरी घे !

तू वडाच्या झाडाला दोरे बांध न बांध पण
त्या आधी तुझ्या भोवतालच्या बेड्या तरी तोड !

- समीर गायकवाड

(या पोस्टसाठी वापरलेला फोटो 'सेव्ह अवर सिस्टर्स' या एनजीओचा आहे.... घरगुती हिंसाचाराच्या पिडीत असलेल्या महिलांसाठी ही संस्था काम करते... https://www.girlsglobe.org/2013/09/10/save-our-sisters-the-abused-goddesses-campaign/ ...)

1 comment:

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...