ते सोशल मीडिया युजर्स होते,
त्यांनी 'त्यांच्या' मरणाची मोठी प्रतिक्षा केली होती.
मोठाले लेख लिहून तयार ठेवले होते,
'त्यांच्या' कवितावर आपल्या कविता पाडल्या होत्या.
श्रद्धांजलीच्या यच्चयावत लंब्या चौड्या पोस्टसनी ते सुसज्ज होते....
ते व्हॉटसऍप युजर्स होते,
त्यांनाही 'त्यांच्या' मरणवृत्ताची खूप घाई झाली होती.
त्यांनी फोटो एडिट करून ठेवले होते,
अश्रू ढाळणाऱ्या स्मायली वाटच बघत होत्या,
'त्यांच्या' मरणाची बातमी आली रे आली की ते या पोस्ट्सचा तुफान मारा करणार होते.
किती प्रोफाइलला आणि कोणकोणत्या ग्रुप्सना 'त्यांच्या' श्रद्धांजलीचे कॉपी पेस्ट फॉरवर्ड कधी एकदा करेन असे त्यांना झाले होते...
ते वृत्तवाहिन्यांचे संपादक, निवेदक होते.
त्यांना तर 'त्यांच्या' मरणाची अफाट घाई झाली होती,
मरणावृत्ताची भयानक रेस त्यांच्यात लागली होती,
काहींनी तर तितकीही प्रतिक्षा केली नाही.
ते तरी काय करणार !
'त्यांच्या' अनेक क्लिप्स, इन्फो डाटा, अनेक बाईटस त्यांनी खच्चून गोळा करून ठेवल्या होत्या...
दिवाळीत फटाक्याची वात खुडून उदबत्तीने तो पेटवावा आणि तो फटाका कधी उडतो याकडे कान देऊन बसावे,
इतक्या सहजतेने काही लोक मरणोत्सुक झाले होते....
मरणोत्सुकांच्या गर्दीने आज मी मृत्यूस मारताना पाहिले..
- समीर गायकवाड
(टीप - काही सन्माननिय लोक या गर्दीला अपवाद आहेत)
_______________________
आणखी पार्श्वभूमी -
समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांचे निधन होण्यापूर्वीच विधानमंडळाने त्यांना श्रद्धांजली वाहिली होती याची अनेकांनी आठवण करून दिली कारण तेंव्हा असा सोशल मीडिया नव्हता तरीदेखील तसे घडले होते. मात्र त्या घटनेमागे अनवधानाने मिळालेली चुकीची माहिती आणि सनसनाटीपणा होता. शिवाय जेपींच्या विचारांना असणारा विरोधही छुप्या पद्धतीने व्यक्त झाला होता हे देखील एक सत्य होतेच! जयप्रकाश नारायण नंतर खरेच गेले आणि झालेली गफलत समोर आली. दिलगिरी व्यक्तवणे वगैरे सोपस्कार झाले. मात्र एक अनिष्ट गोष्ट घडून गेली हे नाकारता येणार नाही. मागील काही वर्षांत अटलबिहारी वाजपेयी आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या मृत्यूसमयी मात्र वेगळ्या पद्धतीची मरणघाई समोर आली. वाजपेयींच्या मृत्यूची बातमी कोण आधी देतो यावरून माध्यमांमध्ये जणू चढाओढ लागली होती. कुठलीही खातरजमा न करता केवळ सूत्रांच्या आधारे अशा मथळ्याखाली टीआरपीचे रक्तपिपासू काहीही बातम्या देत होते आणि लोक त्यावर विश्वास ठेवून व्यक्त होत होते.
अशीच अधीरता आणि व्याकुळता शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळी पाहण्यात आली. बाळासाहेबांच्या प्रकृतीत काही आराम पडत नव्हता आणि लाखोंच्या संख्येने लोक मुंबईकडे कूच करत होते, प्रत्येकास काळजी होती की आपला हा महानायक आपल्याला सोडून जातो की काय? शिवसैनिक तर घायाळ झालेच होते मात्र त्यांच्या व्यतिरीक्त सामान्य माणसे ज्या पद्धतीने शोकाकुल झाली होती ते अत्यंत हृदयद्रावक होतं. याचा गैरफायदा घेत वृत्तवाहिन्यांनी अनेक फेक न्यूज चालवल्या, सोशल मीडियावर देखील लोक व्यक्त होत गेले. मात्र त्यात कुठे विकृती विखार नव्हता. मात्र मागील काही वर्षांत काही नामवंत व्यक्तींच्या निधनानंतर हे संकेत धुळीस मिळवले गेले आणि मरणोपरांत विखाराचे गटार बेलाशकपणे वाहू लागले! लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे आणि आता विक्रम गोखले यांच्या मृत्यूनंतर यात वाढत्या पद्धतीने विखार पाहण्यात आला.
मुळात याची सुरुवात भाजपच्या आयटीसेल कडून झाली. गांधीजी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या बद्दल वाईटसाईट खोटे नाटे पसरवले गेले. त्याची परतफेड करताना त्यांच्या विचारधारेस ज्यांचे समर्थन होते अशांच्या मृत्यूनंतर विरोधी विचारांच्या लोकांनी आपल्या मनातला द्रोह बाहेर काढला. विक्रम गोखले हे मरणासन्न होते त्यांच्या निधनाची औपचारिक घोषणादेखील झाली नव्हती असे असूनही अनेक जबाबदार दैनिकांनी आणि वेबपोर्टल्सनि त्यांच्या मृत्यूची बातमी दिली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली, त्यात अनेकांनी आपल्या मनातल्या भावनांना वाट करू दिली तर काहींनी आपला राग संताप व्यक्त करताना नैतिकता गुंडाळून ठेवली. आपल्याला ज्यांचे विचार पटत नाहीत त्यांच्याविषयीचा आपले मतभेद आपण कधीही व्यक्त करू शकतो, किंबहुना मरण पावलेल्या व्यक्तीविषयी गोडगोडच बोलले पाहिजे हा हट्ट देखील चुकीचाच आहे कारण चिकित्सा प्रत्येक गोष्टीची व्हायलाच हवी. त्यात कुठला अपवाद असता कामा नये. मात्र चिकित्सा करण्यासाठी एक वेळ टाळता येते ती म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या मृत्यूचा दिवस! किमान त्या दिवशी साधी नि नितळ श्रद्धांजली वाहिली जावी ती देखील इच्छा असेल तर! नाहीतर त्याही उद्योगात पडू नये. खेरीज आपले काही विचारभेद असतील तर अशांच्या मृत्यूनंतर काही कालावधीनंतरही व्यक्त होता येतेच की! त्यास कुणाची आडकाठीही असणार नाही. मानवता आणि विवेक यांच्या वाटेवरून जायचे असेल तर इतके तर आपल्याला केलेच पाहिजे. कुणाच्याही मरणोपरांत व्यक्त होताना थोडेसे भान राखलेच पाहिजे, कारण आपलं माणूसपण तगून असल्याची ती एक बोलकी खूण असते!
- समीर गायकवाड
No comments:
Post a Comment