खरं तर, तुला मरून सहा महिने उलटून गेलेत!
लोकांनी, माध्यमांनी मात्र तुझ्या मृत्यूचा बाजार हिरिरीने मांडलाय
तुझ्या नावाखाली हरेकास आपली पोळी भाजून घ्यायचीय
आपले विचार पुढे रेटायचेत,
असलेले, नसलेले 'इझम' खोल खोल रुजवायचेत
पहार ठोकावी तसे सर्वजण तुझ्या अवशेषांना अगदी खोल मेंदूच्या भुयारात ठोकत आहेत.
तू पुन्हा पुन्हा मिनिटाला हरेक वृत्तवाहिनीवर मरते आहेस
लोकांच्या सोशल मीडियामधल्या पोस्टमध्ये तुझ्या चिंधड्या उडताहेत
काहींनी तर तुझ्या मरणावरही मिम्स बनवलीत
तुझा मृत्यू हा आमच्या विचारधारा पसरवायचा इव्हेन्ट झालाय.
पोरी, तुला खूप दुःख होत असेल ना गं!
'त्याने' तुझे तुकडे केले तेंव्हाही तू इतकी व्यथित झाली नव्हतीस ना!
तुझा बाजार आणखी काही दिवस चालेल,
पुन्हा सारं विसरून सारे नव्या हाडाच्या प्रतिक्षेत राहतील
नवं हाडूक मिळताच तुला अगदी अलगदपणे स्मृतींच्या विजनवासात सोडतील.
तिथे असेल काळाकभिन्न अंधार आणि जीव गुदमरवून टाकणारा एकांत!
मात्र भिऊ नकोस बाळा, तू मोठी धीराची पोर आहेस!
कैक जण तुला नावं ठेवत असतील तरी त्याची पर्वा करू नकोस.
तुला पुन्हा लेकीचा जन्म घ्यावा वाटला तर माझ्या पोटी जन्म घे
तसेही तुझ्यासारख्या शोषितांचे आत्मे माझ्या मस्तकात, हृदयात तेवते आहेत
तेंव्हा पोरी माझ्या पोटी जन्माला ये आणि राहिलेलं आयुष्य मनसोक्त जगून घे!
- समीर गायकवाड
16/11/2022
@shraddha walker murder
Friday, 18 November 2022
Wednesday, 16 November 2022
गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे..
तिथेही आता रात्र झाली असेलमात्र अद्यापही तिथला अंधार फितूर झाला नसेल
ओसरीवरच्या गप्पा जारी असतील
पारावरची लगबग मंदावली असेल
खेळत असतील फुफाट्यात पोरं गल्लीबोळातली
माळवदावरती बसुनी असतील आठवणींचे उदास पक्षी
देवळाच्या पायऱ्यांपाशी असतील काही जख्ख वृद्धा
तर काही वाहत असतील सरपणाची, माळव्याची ओझी
स्वयंपाकघरातल्या कालवणांचा गंध पसरला असेल वाऱ्यावर
निजली असेल गोठ्यातली गाय वासराला चाटून झाल्यावर
बारीक आवाजात सुरु असतील गप्पा बायकांच्या
विषय तोच असला तरी जिवंतपणा असेल बोलण्यात त्यांच्या
जीर्ण दगडी वाडे काही झुकले असतील
निष्पर्ण नसूनही झाडे काही वाकली असतील
संथ चालत असतील थकलेली शिसवी माणसं काठी धरून
वाटेने येणाऱ्यास अडवून हालहवाल विचारत असतील, हात फिरवत खांद्यावरून
पानाची चंची उघडली जात असेल
देठ खुडून चुना लावताना जुन्याच गप्पांना रंग चढत असेल
बोलता बोलता विषय निघत असेल
पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलेल्या पिढीचा कासरा कोण ओढत असेल?
आठवणींनी कासावीस झालेले म्हातारे कुणीएक डोळे पुसत असतील नजर चुकवून
इथे उचक्या लागल्या बरोबर उमगते
याद कोणाची निघते अन् मनातल्या गोठ्यातली गाय रडते हंबरून
गाय रडते हंबरून.
गावाकडे अजुनी, साधेच एक घर आहे माझे
तिथलाच अंधार पहाटेस माझ्या उशाशी येऊन बसतो मायेची साय पांघरून...
- समीर गायकवाड
#sameerbapu #sameer_gaikwad
Thursday, 3 November 2022
सांगा आम्हाला भारतमाता म्हणाल की नाही?
भरीस आम्हाला नवराही आहे
त्यानेच आम्हाला बाजारात उभं केलंय ही गोष्ट अलाहिदा!
आम्ही कष्टाने कमावतो आणि ताठ मानेने जगतो!
आता तर तुमच्या अटीशर्तीतही आम्ही बसतो,
सांगा आम्हाला भारतमाता म्हणाल की नाही?
आमचा देह कोरलाय सर्व धर्मांच्या स्पर्शसुक्तांनी
गोंदवून घेतलेत आम्ही आमचे स्तनही वेदनांनी!
भारतमातेच्या नि आमच्या संवेदना सारख्याच आहेत
तिरस्कारग्रस्तांनो तुम्हाला त्या कळायच्याच नाहीत!
- समीर गायकवाड
त्यानेच आम्हाला बाजारात उभं केलंय ही गोष्ट अलाहिदा!
आम्ही कष्टाने कमावतो आणि ताठ मानेने जगतो!
आता तर तुमच्या अटीशर्तीतही आम्ही बसतो,
सांगा आम्हाला भारतमाता म्हणाल की नाही?
आमचा देह कोरलाय सर्व धर्मांच्या स्पर्शसुक्तांनी
गोंदवून घेतलेत आम्ही आमचे स्तनही वेदनांनी!
भारतमातेच्या नि आमच्या संवेदना सारख्याच आहेत
तिरस्कारग्रस्तांनो तुम्हाला त्या कळायच्याच नाहीत!
- समीर गायकवाड
०४/११/२०२२
Subscribe to:
Comments (Atom)
शहरातील बेघर भिकारी
शहरातील बेघर भिकारी रात्री रिकाम्या पोटी धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...
-
वाळूतले ठसे तुझे, केंव्हाच मिटून गेले पण देहाचा गंध अजुनी दरवळतो किनाऱ्यावर त्या गंधवेडापायी तर, समुद्रास भरती येत नसेल ना ? तुला भेटलो...
-
पाऊस 'काळ्या माती'तही पडलाय आणि 'लाल माती'वरही त्यानं उच्छाद मांडलाय पुराचं पाणी मंदिरातही शिरलंय आणि मास्जिदीतही शि...
-
रुळाजवळ तुटून पडलेली ती बत्तीस पावलं चालून चालून भेगाळून चिरून गेलेली होती. त्यांच्या देहावरून रेल्वे गेली तेंव्हा ते थकलेले जीव निद्राधीन...
-
कालच तुझ्या शहरात जोरदार पाऊस पडलाय. मेघांना विचारलंस का, की ते कुठून आले होते ? पावसात चिंब भिजतानाची तुझी तस्वीर घेऊन मेघ सकाळीच परतले...
-
वेळ मिळताच मी बागेत चक्कर टाकून येत असतो. अलीकडेच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपण दोघं ज्या बाकावर बसायचो, नेमक्या त्याच बाकावर आता एक तरत...

