Wednesday, 12 September 2018

मोह


उमर जरी माझी ढळली तरी कष्टाचे देणे फिटत नाही
प्रारब्धाच्याही छिलल्या रेषा, कासरा हातचा सुटत नाही

माझ्याच जीवाचे जीर्णदुखणे सांगू किती, हे उमगत नाही
कळता मुक्या जीवांचे बोल, वाटते सुख माझे सरत नाही !

वेदनांचे ढोल वाजवू किती, सुखाचा आलाप संपत नाही
अश्रूंनी चेहरा झाला म्लान जरी, तेज सुखाचे लपत नाही

उगाच का उदास व्हावे ? मळभ मनीचे आता तरत नाही...
वेलींचे नक्षत्रवेडे फुल कस्तुरीच्या गंधभारास झुरत नाही

कलत्या सांजवृक्षाची नादमय पानगळ हूरहुरत नाही
घनगर्द सावल्यांच्या नक्षीचा चकवा, दारात भटकत नाही

जगणे उरलेच किती म्हणून चकोरचांदणे हिरमुसत नाही,
उमर जरी माझी ढळली तरी संसारसुखाचे देणे फिटत नाही. 
भाळीच्या थिजल्या रेषा, घनमोह अंतरंगाचा तुटतच नाही !

- समीर गायकवाड.


No comments:

Post a Comment

या फुलांमुळेच हे शहर शोभिवंत आहे!

अबोलीचं फुल एकटंच उभं होतं बसस्टॉपवर एक लिली आणि एक डेझी उभी होती थियेटरबाहेर, हाती मोबाईल घेऊन ! मंदिराच्या पायऱ्यांवर हात जोडून उभ्या होत्...