Sunday 5 February 2023

मीरामार बीचवरचा देखणा म्हातारा


मीरामारच्या बीचवर एक देखणा म्हातारा भेटलेला.
सांजरंगात त्याच्या डोईवरची चांदी तांबूस भासत होती.
सरळ नाक, पाणीदार डोळे, कमानी भुवया, कपाळावर आठ्यांच्या रेषा
गालावर सुरकुत्यांची नक्षी नि शुभ्र दाढी.
अगदी रोमन वाटत होता तो!

म्हातारा ओळखीचा असण्याचा सवालच नव्हता
त्याची नजर समुद्रावर एकटक खिळून होती.
त्याच्यात एक विलक्षण आकर्षण होतं, चुंबकासारखं खेचण्याचं!
खूप वेळ झाला तरी तो तिथेच बसून होता.

न राहवून त्याच्याजवळ गेलो,
स्मितहास्य करत हस्तांदोलनासाठी हात पुढे केले.
त्यानेही हात हाती दिले,
एकाएकी भारल्यागत होत त्याच्या त्वचा सैल झालेल्या हाताचं चुंबन घेतलं
त्याचा स्पर्श अद्भूत होता,
नकळत अनेक आठवणींच्या तारा छेडून गेला!
माझे डोळे आसावले अन् देह शहारला.

बहुधा माझ्याबद्दल म्हाताऱ्याला वाईट वाटलं असावं,
त्यानं माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं, पाठीवरुन हात फिरवला.
माझ्या असलेल्या नसलेल्या दुःखांचं सांत्वन केलं,
एक शब्दही न बोलता!
तो कमालीचा मनकवडा असावा.

मग थिजल्यागत त्याच्यापाशी बसून राहिलो,
त्याचे मंद श्वास अनुभवत राहिलो.
म्हातारा अगदी सूक्ष्म स्वरात व्हिस्परत होता.

एकाएकी त्याने समुद्रावरची नजर हटवली नि
तलम शर्टमधलं शिंपलं बाहेर काढून समुद्राच्या दिशेने भिरकावलं.

तितक्यात त्याला न्यायला स्नेहमंदिरची पिवळी करडी बस आली.
म्हणजे तो ओल्ड एज होममध्ये राहत असावा.

बसच्या दिशेने तो एका संथ लयीत चालत निघाला
अकारण मीही त्याच्या मागोमाग निघालो
एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत असल्यासारखं वाटलं.

दोघेही बोलत नव्हतो,
बसजवळ आल्यावर म्हाताऱ्याने मागे वळून पुन्हा एकवार समुद्राकडे पाहिलं
आता त्याच्या डोळ्यांच्या कडा किंचित ओलावल्या होत्या.

मी पुन्हा त्याचा हात हाती घेतला तेंव्हा
फार जुनी जान पहचान असल्यासारखं वाटलं, देहाची शेवरी झाली!

माझी घालमेल पाहून एक आर्त उसासा टाकत
तो काचबिंदी डोळ्यांचा म्हातारा एकदाचा बोलता झाला.

त्याने सांगितलं -
"कुठल्याही समस्येवर तीनच उपाय आहेत घाम, अश्रू आणि समुद्र!
घाम गाळण्याचं वय आता राहिलं नाही,
म्हणून इथे येतो समुद्र डोळ्यांत साठवतो,
मग निरवानिरवीला आपसूक अश्रू निघतातच!"
शेवटच्या ओळीला त्याचा स्वर सद्गदित झाल्यासारखं वाटलं .

तेव्हढयात अतर्क्य वेगाने बसच्या पायऱ्या चढून
तो आत जाऊन खिडकीपाशी बसला देखील!

मी तिथेच उभा होतो
नकळत माझे हात उंचावले, सायोनारा करण्यासाठी.
खिडकी आडचे मऊशार हातही हलले..

त्या दिवशीचा समुद्र खूप आपलासा वाटला
नकळत मनावरचं ओझं दूर करुन गेला.

मीरामारच्या बीचवरचा तो म्हातारा आताही समुद्रापाशी जाऊन बसला असेल..

एकाएकी अनंतास निघून गेलेल्या पत्नीच्या आठवणी समुद्रास तितक्याच तन्मयतेने सांगत असेल..

त्याचे हात हातात घ्यायला कुणाला उसंत मिळाली असेल की नाही
कुणास ठाऊक?

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...