Wednesday 31 May 2023

मौनातला संवाद

अंधार बऱ्यापैकी गडद झाल्यावरसोसायटीच्या बाहेर मेन रस्त्यावरची वर्दळ कमी होते
एरव्ही कंजेस्टेड वाटणारा रस्ताही भलामोठा वाटू लागतो.
जिथे स्ट्रीटलाईटचा उजेड क्षीण झालेला असतो
त्या भागात रस्त्यालगतच्या फुटपाथवर 'ते' दोघं नकळत येऊन बसतात.
दोघेही असतात धुमसत अंतर्बाह्य !

वन नाहीतर टूबीएचकेच्या खुराड्यात रोजच उडत असतात खटके
कधी तिचे तर कधी त्याचे,
कधी कामावरून तर कधी पैशाच्या कडकीवरून
तर कधी घरातल्याच कुणाशी तरी वाद झाल्यावरून नाहीतर रोजच्याच टोमण्यांवरुन!
दोघे परस्परांना वैतागलेले असतात,
नातं अक्षरशः नको नकोसे झालेलं असतं.
ते हमरातुमरीवर येतात
मात्र आपला आवाज कुणालाही ऐकू जाणार नाही याची दक्षता घेत असतात.
खूप वादावादी होते.

अखेरीस तिचा संयम संपतो
ती हमसून हमसून रडू लागते, तो कावराबावरा होतो.
मूक होऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो
तिचे रडणे काहीसे कमी होते, मात्र डोळे वाहतच असतात,
कुणालाही दिसणार नाही याची काळजी घेत पदराने अश्रू टिपत राहते.

त्याला राहवत नाही, तो तिचे हात आपल्या हातात घेतो
काहीही न बोलता गच्च धरून ठेवतो.
ती एकदम शांत होते, खोल समुद्रागत!
बराच वेळ ते दोघे तसेच बसून राहतात.

आता निर्मनुष्य होऊ लागलेल्या रस्त्यावर सामसूम झालेली असते
तो तिच्या मखमली गालांवरचे उष्म ओघळ अलगद पुसतो
पुन्हा तिचे हात दृढपणे हाती घेतो
दोघे काहीतरी हळू आवाजात पुटपुटतात
नि नकळत उठून उभे राहतात.

तो मनगटावरच्या घड्याळाकडे पाहतो
ती पदर नीट करते, विस्कटलेले केस नीटनेटके करते
तळहातांनीं चेहरा लख्ख पुसून घेते
सवयीने त्याचा हात हाती धरुन घराच्या दिशेने चालू लागते...

आधीचे त्यांचे आक्रसलेले चिंताक्रांत चेहरे आता किंचित समाधानी वाटत असतात
मध्येच तो कसला तरी विनोद करतो, ती अगदी मंद स्मितहास्य करते!
तिला हसताना पाहून निळ्याकाळ्या नभांतला चंद्रमा खुलतो,
शुक्राच्या चांदणीकडे डोळे भरून पाहतो!..

रस्त्याच्या त्या भागात रात्री उशिरा कुणी न कुणी जोडपं येऊन बसतंच.
घरातले वाद, घरातली घुसमट, न मिळालेली स्पेस अन्
मरून गेलेल्या सहस्रावधी ईच्छा
सारं सारं त्यांच्या भांडणात दरवळत असतं
बराच वेळ तिथे बसल्यानंतर त्यांच्यातले वाद मिटतात.
तिथे असं काय बरं होत असावं?

फार काही होत नसावं!
अगदी आश्वस्त होऊन ते दोघे एकमेकांचा हात हाती घेऊन मौन बसतात
तेंव्हा त्यांच्यातलं प्रेम एकमेकांच्या धमन्यांमधून वाहत असावं!
हात हाती घेऊन बसल्यावर एकही शब्द बोलला नाही तर या हृदयीचे त्या हृदयी होते!
पुढे काही बोलायची गरज उरलेली नसते!

रात्र मध्यावर आलीय.
आताचे जोडपेही घराकडे निघालेय, चंद्रमाही खुश झालाय!

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...