Monday 3 July 2023

मखमल

आज्जा सांगायचा, "कधी बी गावाकडं आलं की आधी मला भेटायचं.."

आता तो नाहीये, त्याला जाऊन दशके लोटलीत, तरीही तो भेटतच असतो!
गावाकडच्या रस्त्यांनी असलेल्या घनदाट झाडांच्या सावलीत
पांदीतल्या शांत शीतल आमराईत, गावंदरीच्या जुनेर घालमेलीत!

आज्जा भेटतो वेशीवरल्या मंदिराच्या गाभाऱ्यात, शिवंवरल्या पिंपळांच्या पारंब्यात
शेताच्या वाटंवरल्या डोहात अन् गव्हाच्या कोवळ्या लोंब्यांत

घरी गेलं की आज्जा दिसतो ढेलजंत, पडवीत तर कधी दिसतो अंगणात,
सारवण केलेल्या भिंतींना टेकून बसलेला तर कधी पोत्यांची चवड रचणारा

तुळशी वृंदावनात तेवणाऱ्या पणतीच्या मंद ज्योतीत त्याचा चेहरा तरळतो
कंदिलाची काच पुसताना, आरशात डोकावताना, विहिरीत उतरतानाही तो दिसतो

जुंधळ्याला लगडलेल्या चांदण्यांत तो चमकतो, गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यांत पाझरतो
बांधावरल्या बोरीबाभळींच्या काट्यात वसतो, दावणीतल्या मूक वेदनांमध्ये झुरतो

आज्जा नांगराच्या फाळातून मातीत शिरतो, कंच पिकांतून उगवून येतो
हिरव्या पिवळ्या कोंबांच्या देठांत राहतो, कळ्यांची फुले होताना उमलून येतो

आज्जा नाही असा परीघ नाही,
आज्जा काळजात असतो आणि नातीला लावलेल्या काजळातही असतो
रातीला बाजंवर झोपी गेलं की बिलोरी चांदण्यांतुन खाली उतरतो,
अलगद गाल कुरवाळतो,
त्याच्या हातावरची मखमल गालावर ठेवून पहाटेस निघून जातो!

आज्जा पिढ्या न पिढ्या जिवंत असतो!
फक्त नावं बदलत जातात, माणूस तोच असतो!

- समीर गायकवाड

No comments:

Post a Comment

हृदयस्थ दरवळ ..

त्या पावसाळी रात्री 'ती' आली होती, 'त्याला' भेटायला गडद झालेल्या अंधारात. बागेजवळच्या वर्दळीच्या कोनाड्यात. तिने टेक्स्ट मेस...