Friday, 10 October 2025

सीनामायचं पाणी..

या आठवड्यात गावात अतिवृष्टी झाली
भयंकर पूर आला, शेती बुडाली, गावाची दुर्दशा झाली;
दोन वर्षांपूर्वी म्हाताऱ्या आबाजीच्या पोक्त मुलाने
नापिकीपायी बांधावरच्या लिंबावर फास घेतलेला.

पाऊस ओसरला नि आज आबाजीचा नातू
शाळेसाठी शहराकडे रवाना झाला.
तो घरातून निघाला तेव्हा आबाजीने
त्याच्या दप्तरात बांधावरल्या लिंबाचा पाला
ठेवला आणि सांगितलं की,
पोरा, हारायचं नाही, लढायचं!
कधी थकल्यासारखं वाटलं, जगण्याची इरस कमी पडली तर
तर या पानांकडे पाहायचं
तुझा बा त्यात दिसंल
त्याचे अश्रू दिसतील, पश्चाताप दिसेल!
पोरा असं नाव कमव की, घराचा उंबरठा रसरसून गेला पाहिजे
अंगणातल्या सोनचाफा बहरला पाहिजे
मग बघ, तुझ्या आईलाही नजर येईल.

आबाजीच्या सुनेला सतत स्वप्ने पडतात.
ज्यात, केवळ आणि केवळ लिंबाचं झाड दिसतं.
तिच्या मस्तकांतलं लिंबाचं झाड तेव्हाच लुप्त होईल जेव्हा तिचा मुलगा शिकून मोठा होईल!
तसे तर पाचेक सालापुर्वी डोक्यावर बाभळ कोसळली
तेव्हा तिची दृष्टी गेलेली.
तरीही ती शेतात जाते, सवयीने सगळी कामे करते.

औंदा सीनेचं पाणी गावात आलं
तिच्या घराला विळखा घालून बसलं, हळूहळू ओसरलं.
पण सीनामाय मात्र निघून गेली नाही
तिच्या गोठलेल्या डोळ्यांत थिजून राहिलीय
तिनेही सीनामायला डोळ्यात जागा दिलीय
नाहीतरी आजकाल नदीला कोण आपलं म्हणतं?

- समीर गायकवाड.

No comments:

Post a Comment

शहरातील बेघर भिकारी

शहरातील बेघर भिकारी  रात्री रिकाम्या पोटी  धुळकट आडोशांना झोपी जातात. दिवसभर ते इकडे तिकडे भटकतात रात्रीची झोपायची जागा सलामत राहू दे म्हणून...